सर्वसमाज विचार महोत्सव समिति तर्फे सत्यशोधक समाज 150 वर्ष आरंभ गौरव सभा सपन्न

0
16

गोंदिया:- बहुजन कष्टकरी शेतकरी, शुद्रातिशूद्र स्त्रिया, शोषित पीड़ित समाजाला शोषणाच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी महात्मा जोतिराव फुले यांनी सन 1873 ला सत्यशोधक समाजाची स्थापना केली. त्यास सप्टेंबर सन 2022 ला एकशे एकोणपन्नास वर्षे पूर्ण होऊन 150 वे वर्ष म्हणजे शतकोत्तर सुवर्ण वर्ष सुरू होत असल्या निमित्त “सत्यशोधक समाज 150 वर्ष आरंभ गौरव सभा” मानवतावादी प्रबोधन कार्यक्रम नुकतेच स्थानिक शास्त्री वार्ड भोंगाड़े निवास परिसरात विविध वर्ग समाजाला संघटित करण्यासाठी सतत प्रयत्न करणाऱ्या सर्वसमाज विचार महोत्सव समितितर्फे आयोजित करण्यात आली.
सर्वसमाज विचार महोत्सव समिति प्रमुख प्रा.डॉ. दिशा गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या सभेची सुरुवात महात्मा फुले , सावित्रीमाई फुले, फातिमा शेख यांच्या छायाचित्रा समोर दीप प्रज्वलन, माल्यार्पण करून झाली. तदनंतर महात्मा फुले रचित साहित्यावर प्रकाश टाकून सावित्रीमाई व ज्योतिबा रचित कवितांचे पठन व मानवतावादी विचासरधारेवर प्रबोधन करण्यात आले. विद्यार्थिनी हिना लांजेवार व माधुरी भोयर यांना उत्कृष्ट वेशभूषा व सावित्री माई व महात्मा फुले रचित कविता प्रस्तुति करीता पुरस्कृत करण्यात आले.
या प्रसंगी सर्वसमाज विचार महोत्सव समिति अध्यक्ष प्रा.डॉ. दिशा गेडाम सह संविधान मैत्री संघच्या शीतल कुंभारे, ओबीसी संघर्ष कृति समितिच्या माधुरी कैलाश भेलावे, युवा बहुजन मंचच्या रिना भोंगाड़े, आशा भांडारकर, रिपोर्टर आरती पारधी, माया भेलावे, दीपा यादव, सुनीता संतोष वैद्य, संतोषी तिड़के, शेवंता भोंगाड़े, लीला मेश्राम, राजेश्वरी रहांगडाले, वरिष्ठ नागरिक वसंत गवळी, सुनील भोंगाड़े, रवि भांडारकर, शुभम आहाके, परमानंद मेश्राम, परभणी हुन आलेले बहुजन क्रांति मोर्चाचे दीपक शिंदे प्रामुख्याने उपस्थित होते.
“गोर गरीब पीड़ित समाजाला मानवी मूल्य व मूलभूत अधीकारापासुन वंचित ठेवणारे जमीनदार, शेटजी व पुरोहितांकडून होणाऱ्या अन्याय, अत्याचारापासून , गुलामगिरीतून शूद्रातिशूद्र समाजाची मुक्तता करणे व त्यांना हक्काची जाणीव करून देणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते. म्हणून स्त्री- शूद्र अति शूद्र यांच्या उन्नतीसाठी स्थापन झालेल्या सत्यशोधक समाजाच्या 150 व्या वर्धापन वर्षाची कृतिशील सुरुवात करण्याचा निश्चय आपण करूया आणि महात्मा फुले- सावित्रामाई – फातिमा या शोषित पीडितांचे विश्व निर्माण करणाऱ्या कष्टकऱ्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करणे व त्यांनी पाहिलेले स्वप्न पुर्णत्वास नेणे आपल्या सर्वांचे आद्य कर्तव्य आहे. कृपया सर्व वर्ग समुदायातील महिलांनी/ पुरूषांनी/ विद्यार्थ्यानी येऊन तीळभर का होईना ज्योतिबा सावित्रीमाईंचे ऋणी राहण्यासाठी व त्यांचे इच्छित ध्येय स्वप्ने पूर्णत्वास नेण्यासाठी हातभार लावावा, जर घरी बसलो तर महामानवानी पाहिलेले स्वप्न पूर्ण होणार नाही” असे या प्रसंगी आवाहन उपस्थित मान्यवर विचारवंता द्वारे करण्यात आले.कार्यक्रमात हिरव्या साड्या आणि कपाळावर ऊठुन दिसणारी आडवी चिरी अशी पारंपरिक वेशभूषा करून महिला, विद्यार्थी आले होते.