रोहयोची कामे योग्य नियोजनातून करावी – पालकमंत्री बडोले

0
16

रोजगार हमी योजना कार्यशाळा

गोंदिया,दि. २२ : महाराष्ट्र ही रोजगार हमी योजनेची जननी आहे. जेव्हा ही योजना राज्यात सुरु झाली तेव्हा आपल्या पूर्वीच्या भंडारा जिल्हयात या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. आज रोहयोमध्ये अनेक कामांचा समावेश असून जिल्हयाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने या योजनेची कामे योग्य नियोजनातून करावी. असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात नुकतीच रोजगार हमी योजना कार्यशाळा आयोजित करण्यात आली. कार्यशाळेचे उद्घाटन करतांना पालकमंत्री बडोले बोलत होते. प्रमुख अतिथी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गावडे यांची उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी म्हणाले, रोजगार हमी योजनेतून शेतकरी हिताची कामे होत आहे. रोहयोच्या कामात सध्या गोंदिया जिल्हा राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे. या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी यंत्रणांचा सहभाग महत्वाचा आहे. जिल्हयात पाहिजे त्या प्रमाणात यंत्रणांचा सहभाग मिळत नाही अशी खंत व्यक्त करुन डॉ. सूर्यवंशी म्हणाले, त्यामुळे या योजनेतून मागेल त्याला काम देण्यास विलंब होत आहे. ६०-४० हे कामाचे प्रमाण सांभाळले पाहिजे.

श्री गावडे म्हणाले, रोहयोच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे जिल्हयाचे आर्थिक व सामाजिक जीवनमान उंचावण्यात मदत होईल. ८५ कोटी रुपयांची मालमत्ता या योजनेतून तयार झाली पाहिजे. यासाठी यंत्रणांचा सक्रीय सहभाग महत्वाचा आहे. अकुशल कामातून मजूरांना रोजगार उपलब्ध होईल तर कुशल कामातून मालमत्ता निर्माण होण्यास मदत होईल. आर्थिकदृष्टया मागास असलेल्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यास ही योजना महत्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यशाळेत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या नियोजनाची कार्यपध्दती व वैयक्तिक लाभाच्या योजना या विषयावर गटविकास अधिकारी नारायण जमईवार, जिल्हा हागणदारीमुक्त करणे यावर उपमुख्य कार्यकारी अधिकारी (स्वच्छता) राजेश देशमुख, सिंचन विहीरी व कार्यपध्दती यावर उपमुख्य कार्यकारी अधिकारी (नरेगा) नरेंद्र भांडारकर, तांत्रिक बाबींचे मार्गदर्शन या विषयावर जिल्हा एमआयएस समन्वयक पंकज आंबाडारे, पोल्ट्री शेड, शेळी गोठाचे मग्रारोहयोतून बांधकाम या विषयावर पशूसंवर्धन विभागाचे उपआयुक्त डॉ. के.पी.पटले, मत्स्य व्यवसाय मग्रारोहयोअंतर्गत जिल्हयात संधी या विषयावर मत्स्यव्यवसाय विभागाचे सहायक आयुक्त समीर परवेज यांनी चर्चासत्रादरम्यान संबंधित विषयावर मार्गदर्शन केले.

कार्यशाळेला विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, सहायक कार्यक्रम अधिकारी यांची उपस्थिती होती. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी सहायक लेखा अधिकारी कुलदिप गडलिंग, नायब तहसिलदार व्ही.एम.कौलवकर, सहायक कार्यक्रम अधिकारी राजेश शहारे, जिल्हा एमआयएस समन्वयक पंकज आंबाडरे, लघु टंकलेखक जी.जी. बिसेन, अव्वल कारकून श्री. बारसे, कार्यक्रम व्यवस्थापक सुग्रीस तागडे यांनी परिश्रम घेतले. रोहयोचे सादरीकरण, संचालन व उपस्थितांचे आभार उपजिल्हाधिकारी (रोहयो) आर.टी.शिंदे यांनी मानले.