आरंभ फाउंडेशनच्या वतीने राका/पळसगाव येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

0
16

सडक अर्जुनी.-जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा पळसगाव /राका येथे आरंभ फाउंडेशन इंडियाचे संस्थापक
प्रमानंद शालिकराम रंगारी यांच्याकडून पहिली ते सातवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी सोबतच कॉन्व्हेटच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
जिल्हा परिषद शाळा पळसगाव/राका येथे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी शाळेतर्फे विविध उपक्रम राबवून शाळा विविध क्षेत्रात संपूर्ण जिल्ह्यात नावारूपाला आली आहे.शाळेच्या उपक्रमांची दखल घेत जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा पळसगाव /राका येथील माजी विद्यार्थी तथा मागील ३० वर्षापासून अमेरिकेत वास्तव्यास असलेले उच्चविद्याविभूषित प्रमानंद शालिकराम रंगारी यांच्या आरंभ फाउंडेशन इंडियाच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला.यावेळी शाळेच्या वतीने शाल, श्रीफळ देऊन प्रमानंद शालिकराम रंगारी यांना सन्मानित करण्यात आले. सोबतच शाळेने लोकसभागातून कशाप्रकारे विकास साधला व शाळा भरभराटीस येण्यामागे लोकसहभाग किती महत्वाचा आहे हे आपल्या मनोगतातुन मुख्याध्यापक संदीप तिडके यांनी पटवून दिले. सोबतच शाळेच्या विकासासाठी शाळेत दानपेटी लावण्याचा मानस व्यक्त करून या माध्यमातून शाळेत भव्य भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक मंच उभारणीस सहकार्य करण्याचे आवाहन केले. या आव्हानाला प्रतिसाद देत शुभारंभ प्रसंगी गावकऱ्यांनी पाच हजार रुपयाची धनराशी जमा केली.आरंभ फाउंडेशन इंडियाचे समन्वयक आर.व्ही.मेश्राम यांनी आपल्या प्रास्ताविकेमधून आरंभ फाउंडेशनची वाटचाल व ही संस्था अस्तित्वात आणण्यामागचा उद्देश म्हणजे गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे,दुर्बल-वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती प्रदान करणे,उच्च शिक्षणासाठी मदत करणे या प्रमुख ध्येयपूर्तीसाठी ही संस्था निर्माण करण्यात आली असून जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा पळसगाव/राका येथे चालत असलेल्या उपक्रमांना प्रभावित होऊन सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्याचा मानस फाउंडेशनने केल्याचे उद्गार यावेळी केले.

आरंभ फौंडेशन इंडियाचे संस्थापक प्रमानंद रंगारी यांनी खऱ्या अर्थाने समाजातील विषमता दूर करण्यासाठी ज्यांच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात पैसा आहे.आर्थिक दृष्ट्या सबळ आहेत अशा लोकांनी पुढाकार घेऊन गोर-गरीब ,वंचित, दुर्लक्षित विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी हातभार लावण्याची गरज असल्याचे सांगून सामाजिक बांधिलकीत दर्जेदार, गुणवत्तापूर्ण व संस्कारक्षम शिक्षण देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.तसेच विद्यार्थ्यांनी अभ्यासासाठी मेहनत घ्यावी,शिक्षकांचा आदर करावा,वेळेचा सदुपयोग करावा असे आपल्या मार्गदर्शनात सांगितले. सोबतच पळसगाव शाळेतील पहिलीपासून तर सातवीपर्यंतच्या प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना दरवर्षी ५००/- शिष्यवृत्ती देण्याचे घोषित केले. यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना नोटबुक ,पेन , पेन्सिल व गोड पदार्थ फाऊंडेशनचे पदाधिकारी भोजराज रामटेके, शकुंतलाताई रंगारी, कुसुमताई कांबळे, कमलराव रंगारी,उर्मिलाताई रंगारी, प्रभाकर रामटेके यांच्या हस्ते देण्यात आले.यावेळी फाऊंडेशन च्या वतीने संस्थापक प्रमानंद रंगारी यांनी शाळेला मुख्याध्यापक संदीप तिडके यांना म.फुले यांची प्रतिमा भेट दिली.तसेच कार्यक्रमाचे औचित्य साधून शालेय परिसरात प्रमानंद रंगारी यांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी
कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य कविता रंगारी,सरपंच भारती लोथे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शेखर मल्लेवार, उपाध्यक्ष पुनाराम बनकर ,ग्रामपंचायत सदस्य पूजा कापगते, ग्रामतंटामुक्त समिती अध्यक्ष टिलाराम कापगते, पोलीस पाटील वसंत कापगते, महेश नंदागवळी , भोजराज कापगते,यासह व्यवस्थापन समिती सदस्य, माता पालक शिक्षक संघाचे सदस्य व पालक वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प समन्वयक आर.व्ही.मेश्राम यांनी केले. आभार शिक्षक भास्कर नागपुरे यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरता मुख्याध्यापक संदीप तिडके, विषय शिक्षक भास्कर नागपुरे, सहायक शिक्षक नितीन अंबादे, सौ. एस.टी. कापगते , कु. वर्षा पुस्तोडे ,कु.काजल कापगते यासह विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.