नवजीवन नगराचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमीपूजन

0
28

गडचिरोली : चंद्रपूर मार्गावरील नवेगाव जवळील मौजा मुरखळा येथे आत्मसमर्पित नक्षलवाद्यांसाठी उभारण्यात येत असलेल्या नवजीवन नगर या नवीन वसाहतीचे भूमीपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. ही देशातील पहिलीच आत्मसमर्पित नक्षलवाद्यांची वसाहत आहे हे विशेष.

याप्रसंगी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम, आमदार डॉ. देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे, नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रवींद्र कदम, नक्षल विरोधी अभियानाचे विशेष पोलीस महानिरीक्षक शिवाजी बोडखे, केंद्रीय राखीव पोलीस दलाचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय लाटकर, जिल्हाधिकारी रणजित कुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर आदी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी भूखंड मिळालेल्या आत्मसमर्पित नक्षलवाद्यांचे हस्तांदोलन करून सुखी जीवन जगण्यासाठी मुख्य प्रवाहात आल्याबद्दल अभिनंदन केले. जंगलातील नक्षल चळवळ सोडून हिंसेच्या मार्गाचा त्याग करणाऱ्या नक्षलवाद्यांना सुखी समाधानाने जगण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्यावतीने आर्थिक मदतीसह रोजगार उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्याचबरोबर त्यांना राहण्यासाठी घरबांधणीसाठी शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत भूखंड वितरण योजना सन २००५ पासून सुरू करण्यात आली आहे. सदर आत्मसमर्पित नक्षलवाद्यांना भूखंड मिळण्यासाठी पोलीस अधीक्षक गडचिरोली यांनी शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता.

शासनाने सदर प्रस्ताव मंजुर करून जिल्हाधिकारी, गडचिरोली यांच्या आदेशानुसार १० जानेवारी २०१४ अन्वये भूखंड वितरणाचे अधिकार उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले. ७ जून २०१४ रोजी भूखंड रचनाकार, गडचिरोली यांनी १७४ भूखंडांना मंजुरी देण्यात आली. तसेच भूमी अभिलेख यांच्याकडून सीमांकन करण्यात आले. आत्मसमर्पित नक्षलवाद्यांसाठी ५.५३ हेक्टर जमीन मंजुर करण्यात आली आहे.

या जागेवर ३० बाय ३० चौ. फुटाचे एकूण १७४ भूखंड तयार करण्यात आले आहेत. या जागेवर अंगणवाडी, शाळा, समाज मंदिरासाठी २७६९.३७५ चौ.मी., बाजारासाठी ५१३.१३५ चौ.मी. आणि खुली जागा ३४०८.२० चौ.मी. ठेवण्यात आली आहे. आत्मसमर्पित नक्षलवाद्यांकडून घरबांधणीसाठी केलेल्या भूखंडांच्या मागणीनुसार पोलीस अधीक्षक, गडचिरोली यांनी आतापर्यंत एकूण १०६ आत्मसमर्पित नक्षलवाद्यांना भूखंड वितरण केले आहे. त्यात आत्मसमर्पित नक्षलवाद्यांना वाटप केलेल्या भूखंडांमध्ये १४ ऑगस्ट २०१४ रोजी ६५ भूखंड, १४ फेब्रुवारी २०१५ रोजी २८ भूखंड, २३ ऑगस्ट २०१५ रोजी १३ भूखंडांचा समावेश आहे.