रब्बीत भात पिकानंतर करडईची लागवड करा- डॉ. शाकीर अली सय्यद

0
27

गोंदिया,दि.19 कृषि विज्ञान केंद्र, हिवरा, गोंदियाच्या वतीने 17 आक्टोंबर 2022 ला कृषि विज्ञान केंद्र हिवरा, गोंदिया येथे पी. एम. किसान सन्मान संमेलनाचे ऑनलाईन आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमा दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतक-यांना संबोधीत केले. या कार्यक्रमाचे औचित्य साधून केंद्राद्वारे करडई पिकाचे बियाणे वाटप करण्यात आले.

भारतीय तेलबिया संशोधन संस्थान, हैद्राबाद द्वारे कृषि विज्ञान केंद्र, हिवरा गोंदिया मार्फत अनु. जाती प्रकल्पांतर्गत 50 अनु. जाती शेतकऱ्यांना तसेच, 75 शेतकऱ्यांना अन्नसुरक्षा अभियांना अंतर्गत करडई पिकाच्या बियाण्यांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला अविनाश लाड, जिल्हा व्यवस्थापक, नाबार्ड, संजय संगेकर, जिल्हा व्यवस्थापक, मावीम आणि विजय बहेकार हे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते.

डॉ. शाकीर अली सय्यद, वरीष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, कृषि विज्ञान केंद्र, हिवरा गोंदिया यांनी भारतीय तेलबिया संशोधन संस्थान, हैद्राबाद यांच्या मार्फत अनु.जातींसाठी मिळालेल्या प्रकल्पाबद्दल शेतकऱ्यांना माहीती दिली आणि रब्बी हंगामातील भात पिकानंतर प्रमुख तेलबिया पिक म्हणुन करडईची ओळख करून पिक विविधतेकडे वळण्याचे आवाहन केले. अविनाश लाड यांनी नाबार्ड अंतर्गत शेतक-यांसाठी असणाऱ्या विविध योजनांची माहीती दिली. तसेच  विजय बहेकार यांनी कृषि विज्ञान केंद्र व नाबार्ड यांच्या योजनांचा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात फायदा घेऊन आपली आर्थिक स्थिती उंचावण्यासाठी आवाहन केले.

          तांत्रीक सत्रामध्ये मनोज भोमटे, विशाल उबरहंडे, राजेभाऊ चव्हाण यांनी करडई पिकाच्या लागवडीपासुन काढणी पर्यंत सविस्तर मार्गदर्शन केले. विशाल उबरहंडे यांनी यावेळी ऑईल मिल व दाल मिल बद्दल माहिती दिली तसेच दोन्ही युनिट लवकरच कृषि विज्ञान केंद्र येथे सुरू होत असल्याचे सांगितले. या कार्यक्रमाचे सुत्र संचालन व आभार प्रदर्शन डॉ. विजयकुमार कोरे, विषय विशेषज्ञ (उद्यानविद्या) यांनी केले. सदर कार्यक्रमास जवळपास 251 शेतकरी व शेतकरी महिला, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.