वन विभागाच्या जागेतून 300 ब्रास मुरुमाचे अवैध खोदकाम करून वाहतूक

0
29
  • गोंदिया उपवनसंरक्षक कार्यालयासमोर उपोषणावर बसण्याचा इशारा

गोंदिया/तिरोडा : गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा तालुक्यातील इंदोरा सहवनक्षेत्र ठाणेगाव येथील गट क्रमांक 738 वन विभाग विभागाच्या जागेतून 300 ब्रास मुरुमाचे अवैध खोदकाम करून वाहतूक संबंधित वन अधिकाऱ्यांच्या संगनमताने करण्यात आलेले आहे. याबाबत मौका पंचनामा 20 ऑक्टोबर 2022  रोजी तिरोडा वनपरिक्षेत्र अधिकारी आर.जी. मून व महसूल अधिकाऱ्यांनी केलेला आहे. सदर प्रकरण दाबण्याचा प्रयत्न संबंधित वन अधिकारी करीत असल्यामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडालेला आहे, असा आरोप पत्रकार राजेशकुमार तायवाडे यांनी केलेला आहे.

या प्रकरणाकडे वन मंत्री व पालक मंत्री सुधीर मुंगटीवार यांनी गांभीर्याने लक्ष देऊन शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडविणाऱ्या वन अधिकाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कार्यवाही करण्यात यावी. तसेच खोदकाम करून घेऊन जाणाऱ्यांवर दंडात्मक कार्यवाही करावी जेणेकरून भविष्यात अशा प्रकारचे प्रकरण घडणार नाही व शासनाचा महसूल बुडविण्याचा कोणीही वन अधिकारी प्रयत्न सुद्धा करणार नाहीत, अशी तक्रार राजेशकुमार तायवाडे यांनी केलेली आहे.

तसेच सदर ठिकाणावरून खोदकाम करण्यात आलेला मुरुमाचा वापर कोणत्या ठिकाणी करण्यात आलेला आहे, याची जाणीव तिरोडा वनपरिक्षेत्र अधिकारी आर.जी. मून यांना माहिती असून सुद्धा संबंधित अधिकाऱ्यांनी अज्ञात आरोपीविरुद्ध वन कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हातून स्थानिक चौकशी केल्यावर माहीत होईल की, एवढ्या मोठ्या प्रमाणात मुरुमाचा अवैधपणे खोदकाम करून वाहतूक कोणत्या ठिकाणी करून मुरुमाचा वापर करण्यात आलेला आहे. मात्र याची जाणीव वनपरिक्षेत्र अधिकारी आर.जी. मून यांना माहिती असून सुद्धा सदर प्रकरण दाबण्याचा प्रयत्न संबंधित अधिकारी करीत आहेत, असा आरोप पत्रकार राजेशकुमार तायवाडे यांनी केलेला आहे.

अवैध खोदकाम

त्यांनी सदर प्रकरणाची तक्रार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजित पवार, मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव, मंत्री (वने) यांचे खासगी सचिव, जिल्हाधिकारी, प्रधान मुख्य वनसंरक्षण (वनबल प्रमुख) नागपूर, प्रधान मुख्य वनसंरक्षण (अर्थसंकल्प, नियोजन व विकास) नागपूर, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षण (प्रादेशिक) नागपूर, मुख्य वनसंरक्षण (प्रादेशिक) महाराष्ट्र राज्य, नागपूर, उपवनसंरक्षक, उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी तिरोडा, तहसीलदार तिरोडा यांना केलेली आहे.सदर प्रकरणात योग्य कार्यवाही करण्यात आलेली नाही तर गोंदिया उपवनसंरक्षक कार्यालयासमोर उपोषणावर बसण्यात येईल, असा इशारा पत्रकार राजेशकुमार तायवाडे यांनी दिलेला आहे.