ओबीसींचे आरक्षण सहा महिन्यांत पूर्ववत करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

0
29

गडचिरोली, दि.४: जिल्हयातील ओबीसी प्रवर्गाचे १९ टक्क्यांवरुन ६ टक्के केलेले आरक्षण येत्या सहा महिन्यांत पूर्ववत करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती आ.डॉ.देवराव होळी व ओबीसी समाज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेला ओबीसी समाज संघटनेचे नेते रमेश मडावी, प्रा.अशोक लांजेवार, रमेश भुरसे, नरेश महाडोरे, केशव सामृतवार, प्रवीण घाटे,रमेश उप्पलवार, बंडू सोनवाने, प्रभाकर गव्हारे, पुंडलिक जुआरे, प्रदीप आवळे उपस्थित होते. आ.होळी यांनी सांगितले की, ओबीसी समाजाचे आरक्षण १९ टक्क्यांवरुन ६ टक्के करण्यात आले आहे. हे आरक्षण पूर्ववत करण्यासाठी ओबीसी समाज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी २३ डिसेंबरपासून इंदिरा गांधी चौकात उपोषण आरंभिले होते. त्यावर चर्चा करण्यासाठी उपोषणकर्त्यांच्या शिष्टमंडळासह आपण १ मार्चला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेतली. श्री.फडणवीस यांनी येत्या ६ महिन्यांत आरक्षण पूर्ववत करण्याचे आश्वासन दिले. यासंदर्भात त्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करणार असल्याचेही सांगितल्याची माहिती आ.डॉ.देवराव होळी यांनी दिली. ओबीसींचे आरक्षण निर्धारित कालावधीत पूर्ववत झाले नाही, तर तीव्र आंदोलन करु, असा इशारा रमेश मडावी यांनी यावेळी दिला.