स्वतंत्र विदर्भासाठी ३१ मार्चला दिल्लीत धरणे आंदोलन

0
13

गोंदिया,दि.५: स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करावे, या प्रमुख मागणीसाठी शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी विदर्भातील हजारो कार्यकर्ते ३१ मार्चला दिल्ली येथील जंतरमंतरवर धरणे आंदोलन करणार असल्याची माहिती विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेला अँड. वामनराव चटप, राम नेवले, डॉ. रमेश गजबे, अँड. नंदा पराते, अरूण केदार,अॅड.टि.बी.कटरे,अॅड.अर्चना नंदागळे,दिपक डोहरे,ढोमणे,अॅड.पराग तिवारी,मोहसीन खान,पुजा तिवारी,आशा नागपूरे व पदाधिकारी उपस्थित होते. 

अॅड.वामनराव चटप यांनी सांगितले की, ३१ मार्चच्या धरणे आंदोलनात मार्गदर्शन करण्याकरिता तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखराव यांना निमंत्रण पाठविण्यात आले आहे. समितीच्या वतीने २८ मार्च ते २ एप्रिलपर्यंत प्रमुख नेत्यांच्या भेटीही घेतल्या जाणार आहेत. लोकसभा व महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी पंतप्रधानांनी स्वतंत्र विदर्भ राज्य व शेतमालाला उत्पादन खर्चाच्या ५० नफा होईल, एवढा हमीभाव देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु सत्तेत येऊन बावीस ते तेवीस महिन्यांचा कालावधी उलटूनही स्वतंत्र विदर्भ राज्य व शेतकर्‍यांच्या समस्या सुटलेल्या नाहीत. याचा जाब कार्यकर्ते पंतप्रधानांना विचारणार आहेत.

स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने २०१३ व २०१५ मध्ये आंदोलन केले. आता ३१ मार्चला धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. स्वतंत्र विदर्भ राज्यासह कर्जमुक्ती, भारनियमन बंद, वीज दर निम्मे करणे, चार लाख नोकर्‍यांचा बॅकलॉग संपविणे यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन होणार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.