मलब्य़ाखाली दबून महिलेचा मृत्यू

0
4

लोहारा(जि. गोंदिया), दि. ५ : विनापरवानगी गिट्टीचे १५ फूट खोल असलेल्या गिट्टी पहाडीवरील मलब्याखाली दबून महिलेचा मृत्यू झाला, तर तिचा पती गंभीररित्या जखमी झाला. ही घटना आज, शनिवारी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास घडली. मृत महिलेचे नाव उर्मिला चितामन मोरदेवे( ४०) असून जखमीचे नाव दिवारू मोरदेवे (वय ४२) दोन्ही रा. ओवारा असे आहे.

देवरी तालुक्यातील ओवारा येथील जिल्हा परिषद शाळेला लागून भाऊराव येरणे यांच्या मालकीची गिट्टी पहाडी आहे. या ठिकाणी गिट्टीचे उत्खनन करण्यात येते. गावातीलच मजूर गिट्टी तोडण्याचेकाम करतात. आज, शनिवारी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास उरमिला मोरदेवे आणि त्यांचे पती चितामन मोरदेवे गिट्टी तोडण्याकरिता गेले. ते गिट्टी तोडण्याकरिता १५ फूट खोल असलेल्या दरीत उतरले. चितामन खाली गिट्टी फोडत असताना वरून मलबा त्यांच्यावर कोसळला. यात त्यांची पत्नी उमिर्ला आणि ते देखील मलब्याखाली दबले. हा प्रकार तेथे उपस्थित असलेल्या मजुरांच्या लक्षात आला. त्यांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. परंतु, उर्मिला यांच्यावर जास्त मलबा असल्याने गुदमरून त्यांचा मृत्यू झाला. भाऊराव येरणे महसूल विभागाची परवानगी संपली असताना देखील खोदकाम करत होते. याकामी त्यांना महसूल विभागाचे आशिर्वाद होते. अवैधरित्या उत्खनन करणे आणि नियम पाच फूटापर्यंत खोदण्याचा असताना १५ फुट खोल खोदकाम करण्यात आले होते. त्यामुळे हा प्रकार घडल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या प्रकरणाला कंत्राटदार भाऊराव येरणे जबाबदार असल्याचा आरोप गावकरी आणि मृताच्या कुटुंबियांनी केला.