विद्यार्थ्यांचे आनंद ठिकाण साखरीटोलाची शाळा

0
13

गोंदिया,दि.५:प्रत्येकच पालकांना त्यांच्या पाल्यांनी उच्च शिक्षण घ्यावे. परदेशात नोकरी करावी, स्पर्धेच्या या युगात कायम प्रथम स्थान पटकवावे व ते टिकवावे देखील असे वाटत राहाते व यासाठी उत्कृष्ट व दर्जेदार शिक्षण देणाऱ्या शाळा व संस्थांची निवड केली जाते. व याची सुरुवातही अगदी कोवळ्या युगात शाळेत जाणेपासून होते. स्पर्धेच्या या युगात शिक्षणसंस्था आपली गुणवत्ता टिकवण्याच्या चढाओढीमध्ये सहभागी झाला आहे. जिल्हा परिषद शाळा हे आव्हान समर्थपणे पेलले असल्याचे चित्र आज आपण आपल्या डोळ्याने पाहतो. अशीच एक शाळा म्हणजे गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील साखरीटोला येथील जि.प. केंद्र प्राथमिक शाळा होय.

आर्थिकदृष्ट्या शिक्षणायोग्य परिस्थिती नसलेले विद्यार्थी, मध्यमवर्गीय मुले यांना उत्तम व चांगल्या दर्जाचे शिक्षण देण्याची जिद्द असलेल्या पालकांसमवेत नवनिर्मितीद्वारे विद्यार्थ्यांना प्रकाशाचे पंख देणारे शिक्षक हे या शाळेचे वैशिष्ट्य होय. विविध उपक्रमाअंतर्गत गावची शाळा आमची शाळा या स्पर्धेत व सेमी इंग्रजीतून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात अव्वल अशा उपक्रमात ही शाळा यशस्वी झाली आहे. परिचय पाठाअंतर्गत विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना देणे, मुलांचा भाषाविकास, विचारांची देवाण-घेवाण तसेच मुलांच्या अभिव्यक्ती व निर्णयक्षमतेत वृध्दी करणाऱ्या सर्व बाबी येथे शिकविल्या जातात. त्याचबरोबर जीवन जगताना आवश्यक असलेले व्यवहारिक ज्ञान, स्वावलंबन, स्वानुभव व क्रियाशिलता यासारख्या नैतिक बाजूचा पायाही भक्कम केल्या जातो. हस्तव्यवसायाअंतर्गत मातीकाम, ठसेकाम, बौद्धीक खेळ, व्याकरणाचा समज, वाचनाची आवड व सवय व विशेष दिनाचेही आयोजन केल्या जाते.

वास्तविक कुटूंब असो किंवा व्यापक समाज असो सहजीवनातूनच विद्यार्थी घडतात, खुलतात व सर्वगुण संपन्न होतात. शिक्षणातून व्यक्ती स्वांतत्र्याला उदंड वाव देणारे सहजीवन फुलविले पाहिजे व हे शिक्षण प्राथमिक जीवनातच प्राप्त होऊ शकते. जीवनाचा पाया मजबूत करण्यासाठी त्याला पर्याय नाही. असा संदेशच जणू येथील शिक्षक देत आहेत. प्राथमिक शिक्षणातूनच सुजाणा नागरिक घडतात हेच खरे.