समता पर्व निमित्ताने  लाभार्थ्यांना विविध लाभाचे वाटप,बक्षिस व पुरस्कार वितरण सोहळा

0
11

 गोंदिया दि. 06: सामाजिक न्याय विभागामार्फत 26 नोव्हेंबर 2022, संविधान दिन ते 6 डिसेंबर 2022, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन या कालावधीत विविध कार्यक्रम घेऊन समता पर्व आयोजित करण्यात आले. त्यानुषंगाने 5 डिसेंबर 2022 रोजी संविधान जागर व येणाऱ्या 6 डिसेंबर महापरिनिर्वान दिनाच्या संदर्भात अभिवादनात्मक कार्यक्रमाचे आयोजन तसेच सामाजिक न्याय विभागाच्या लाभार्थ्यांना विविध लाभाचे वाटप, बक्षिस/पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष उपायुक्त तथा सदस्य, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती राजेश पांडे हे होते तर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून सहायक आयुक्त, समाज कल्याण विनोद मोहतुरे तसेच एस. बी. भांडारकर, सहाय्यक लेखाधिकारी उपस्थित होते.

            या कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह, गोंदिया, मागासवर्गीय तथा आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृह, गोंदिया, मागासवर्गीय मुलीचे शासकीय वसतीगृह नवीन, कुडवा, मागासवर्गीय मुलीचे शासकीय वसतीगृह तिरोडा, मागासवर्गीय मुलीचे शासकीय वसतीगृह सडक अर्जुनी जि. गोंदिया व राजीव गांधी समाजकार्य महाविद्यालय, गोंदिया येथील विद्यार्थी – विद्यार्थीनींनी सहभाग घेतला.

 कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनोद मोहतुरे यांनी केले तर कार्यक्रमाची सुरूवात मुलींचे शासकीय वसतीगृह, गोंदिया येथील विद्यार्थीनींच्या स्वागत नृत्य सादर करून केले. कार्यक्रम प्रसंगी वसतीगृहातील विद्यार्थी तसेच विद्यार्थीनींनी  संविधानपर नृत्य, गीतगायन, समुहगीत, भाषण तसेच एकांकीका, लघुनाटीका, पथनाट्य सादरीकरण करुन उपस्थित प्रेक्षकांना संविधानाचे महत्व पटवून दिले.

 या कार्यक्रमाचे औचित्य साधुन समता पर्व कार्यक्रम अंतर्गत लक्ष्मण मालिकराम खेडकर यांना महा आवास अभियान 2020-21 राज्यस्तरीय पुरस्कार राज्य पुरस्कृत योजना: सर्वोत्कृष्ठ गृहसंकुल व्दितीय पुरस्कारासाठी प्रशस्तीपत्र, शॉल व श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. तसेच श्री आत्माराम बुधाजी खंडाते (बाह्यस्त्रोत कर्मचारी) यांना महा आवास अभियान 2020-21 राज्यस्तरीय विशेष पुरस्कार-रमाई आवास योजना: सर्वोत्कृष्ठ जिल्हा व्दितीय क्रमांक पुरस्कारासाठी प्रशस्तीपत्र, शॉल व श्रीफळ देऊन गौरविण्यात आले.

            तसेच विभागामार्फत घेण्यात आलेल्या संविधान प्रतियोगिता परिक्षा मध्ये विशेष प्राविन्य प्राप्त 25 विद्यार्थ्याना पुरस्कार व स्मृतीचिन्हे व प्रशस्तीपत्र वितरित करण्यात आले. तसचे राजीव गांधी समाजकार्य महाविद्यालय, गोंदिया येथील 30 विद्यार्थ्यांना विभागाच्या विविध उपक्रमात तसेच योजनांच्या प्रचार प्रसिध्दीकरीता  सहकार्य  केल्याबद्दल  प्रशस्तीपत्र वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाचे सुत्र संचालन श्रीमती स्वाती कापसे, समाज कल्याण निरिक्षक यांनी केले. सदर कार्यक्रमास विभागाचे अधिकारी/कर्मचारी, शासकीय वसतीगृहे व शासकीय निवासी शाळांमधील विद्यार्थी-विद्यार्थीनीसह नागरिक उपस्थित होते. सदर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.