नवीन तंत्रज्ञान आत्मसात करुन कार्यशैली गतिमान बनवा – मीनल जोगळेकर

0
9

नागपूर : नवीन तंत्रज्ञान आत्मसात करुन त्या कौशल्याने आपली कार्यशैली गतिमान बनवा. नवीन तंत्रज्ञानामुळे उपलब्ध झालेल्या संधीचा फायदा घेऊन ज्ञान अद्ययावत ठेवावे, असे आवाहन मंत्रालयातील वृत्तचित्र विभागाच्या वरिष्ठ सहाय्यक संचालक मीनल जोगळेकर यांनी केले.

रविभवन येथील सभागृहामध्ये आयोजित माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, नागपूर-अमरावती विभागातील कर्मचाऱ्यांसाठी ‘अत्याधुनिक डिजिटल कॅमेरा विषयक प्रशिक्षण’ कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी श्रीमती जोगळेकर बोलत होत्या. हे प्रशिक्षण दोन दिवस चालणार असून नागपूर-अमरावती विभागातील 16 प्रशिक्षणार्थींचा यात समावेश आहे. माहिती विभागाचे कामकाज अतिशय जलद व सुयोग्य पद्धतीने व्हावे यासाठी ‘सोनी पी. एम. डब्ल्यू 200’ यामॉडेलची सहा कॅमेऱ्यांची खरेदी करण्यात आली आहे. अत्याधुनिक डिजिटल कॅमेरा चालविणाऱ्या सर्व चालकांचे कौशल्य अधिकाधिक वाढावे तसेच या कॅमेऱ्यांची हाताळणी आणि ते सुस्थितीत कसे ठेवावे यासाठी घेण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती व्हावी यासाठी हा प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

यावेळी सेवानिवृत्त दूरदर्शन अधिकारी निसार खान, टेलीरॅड कंपनीचे व्यवस्थापक जयंत पारनेरकर, सोनी इंडिया कंपनीचे अभियंता सचिन श्रीगावकर, जिल्हा माहिती अधिकारी अनिल ठाकरे, सहाय्यक संचालक जगन्नाथ पाटील तसेच माहिती सहायक अपर्णा यावलकर-डांगोरे उपस्थित होत्या.कार्यक्रमाच्या सुरुवातीला सहाय्यक संचालक जगन्नाथ पाटील यांनी कार्यक्रमाची रुपरेषा सांगून प्रशिक्षणार्थींना पाहुण्यांचा परिचय करुन दिला. सूत्रसंचालन अपर्णा यावलकर यांनी केले.