जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ

0
15
????????????????????????????????????

भंडारा, दि. 7 :  सैनिक देशाच्या संरक्षणासाठी आपल्या प्राणाची बाजी लावतात. कुटुंबापासून दूर राहून आपले संरक्षण करीत असतात. त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणे गरजेचे आहे. सशस्त्र सेना ध्वजदिन निधीच्या संकलानाच्या माध्यमातून कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी आपल्याला प्राप्त झाली आहे. त्यासाठी सर्व विभागांनी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले.

जिल्ह्याचा ध्वजदिन निधी संकलन कार्यक्रम आज जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद कक्षात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. मुख्य कार्यकारी अधिकारी एस. एम. कुर्तकोटी, निवासी उपजिल्हाधिकारी महेश पाटील, शिक्षणाधिकारी (माध्य) संजय डोर्लीकर, उपजिल्हाधिकारी तथा प्रभारी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी आकाश अवतारे यांच्यासह वीरमाता, वीरपत्नी व माजी सैनिक उपस्थित होते.

सशस्त्र सेना ध्वज निधी 2022 करिता जिल्ह्याला 35 लक्ष 45 हजार उद्दिष्ट असून त्यापैकी 85 टक्के उद्दिष्ट साध्य झाले. उर्वरित उद्दिष्ट सहज पूर्ण करू, अशी ग्वाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिली. तसेच जिल्ह्यातील माजी सैनिक, वीरमाता व वीरपत्नी यांच्या कोणत्याही अडचणी असतील तर त्यांनी आपला अर्ज जिल्हा सैनिक कार्यालयाकडे द्यावा. त्या अर्जावर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी वीरमाता सिता भागवत माटे, जनाबाई सदानंद मडामे तसेच वीरपत्नी उर्मिला गणपत तितिरमारे, ज्योती हिरामन सिंद्राम, किरण चंद्रशेखर भोंडे यांचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. सैनिक कल्याण विभागामार्फत विशेष गौरव पुरस्कार कु. वर्षा राजू वाडीभस्मे यांना देण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुकुंद ठवकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार वरिष्ठ लिपीक सुधाकर लुटे यांनी मानले.