वाघाच्या हल्यात महागाव येथील इसम गंभीर जखमी

0
69

अर्जुनी-मोरगाव : सरपण आणण्यासाठी जंगलात गेलेल्या महागाव (सिरोली) येथील राजकुमार बळीराम जांभुळकर (वय ६०) या इसमावर वाघाने हल्ला करुन गंभीर जखमी केले. ही घटना बुधवार, ७ डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजेच्या दरम्यान खोळदा बिट जंगलातील वनखंड क्रमांक १२३२ संरक्षित वन येथे घडली.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील महागाव येथील राजकुमार जांभुळकर हा इसम सरपण आणण्यासाठी वनक्षेत्र अर्जुनी मोरगाव अंतर्गत खोळदा बिट येथील वनखंड क्रमांक १२३२ संरक्षित वनात 7 डिसेंबर रोजी सकाळी गेला होता. सकाळी दहा ते अकरा वाजेच्या दरम्यान अचानक वाघाने हल्ला करुन राजकुमार जांभुळकर याला गंभीर जखमी केले. वाघाच्या तावडीतून कसीबसी सुटका करून अत्यंत गंभीर अवस्थेत जखमी राजकुमार घटनास्थळापासून दोन ते तीन किलोमीटर खोळदा गावाजवळील रोडवर आला. खोळदा गावातील लोकांना जखमीने वाघाने हल्ला केल्याचे सांगितले. नागरिकांनी लगेच हालचाली करुन जखमीला उपचारार्थ अॅम्बुलन्स बोलावून ग्रामीण रुग्णालय अर्जुनी मोर येथे हलविण्यात आले. जखमींची प्रकृती व गंभीर जखम असल्याने प्राथमीक उपचार करुन लगेच गोंदियाला हलविण्यात आले.

संभ्रम कायम

राजकुमार जांभुळकर यांचेवर झालेला जंगली जनावराचा हल्ला हा नेमक्या कोणत्या जनावरांचा आहे, हा संभ्रम कायम आहे. गंभीर जखमी इसमाला खोळदा येथील इसमांनी पाणी पाजले, त्यावेळी सदर जखमी इसमाने वाघाने हल्ला केल्याचे सांगितले असी माहीती मिळाली आहे. मात्र वनविभाग मात्र हा हल्ला अस्वलाने केला असावा असा अंदाज लावत आहेत.