विभागीय आयुक्तांची रोंढा येथे रोहयो कामाची पाहणी

0
15

गोंदिया दि. ६ :विभागीय आयुक्त अनुप कूमार यांनी सालेकसा तालुक्यातील रोंढा येथे महाजन तलाव ते पाणगाव तलावापर्यंत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत करण्यात येत असलेल्या पांदण रस्त्याच्या कामाची पाहणी केली. कामावर उपस्थित असलेल्या मजूरांसोबत त्यांनी संवाद साधला. यावेळी पांदण रस्त्याच्या कामावर ३३४ मजूर काम करीत होते. यामध्ये २५५ पुरुष व ७९ महिला उपस्थित होत्या.
मजूरांशी संवाद साधतांना आयुक्तांनी मजूरी किती दिवसामध्ये मिळते, कामावर उपलब्ध असलेल्या सुविधा, बँक खाते, आधार नोंदणी, मागणी केलेल्या कामांची माहिती मिळत असलेल्या मजूरीबाबत माहिती, कामावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, प्रथमोपचार सुविधा, लहान बालकांना कामावर संगोपनासाठी असलेल्या सुविधा याबाबतची माहिती त्यांनी जाणून घेतली.मजूरांना केलेल्या कामाची मजूरी त्यांच्या खात्यावर १५ दिवसाच्या आत जमा झाली पाहिजे. हे काम पूर्ण होताच तलाव खोलीकरणाचे काम मजूरांनाउपलब्ध करुन द्यावे. मागणीप्रमाणे मजूरांना वेळोवेळी काम उपलब्ध करुन देण्याचे निर्देश उपस्थित अधिकाऱ्यांना आयुक्तांनी यावेळी दिले. मजूरीचे दर वाढवून मिळाले पाहिजे तसेच गावात व गावपरिसरात रोहयोची कामे मागणीप्रमाणे उपलब्ध झाली पाहिजे त्यामुळे कामानिमित्त स्थलातंर करण्याची वेळ येणार नाही. असेही उपस्थित मजूरांनी आयुक्तांना सांगितले.महाजन तलाव ते पानगाव तलाव पर्यंतच्या पांदण रस्त्याच्या कामाला १८ फेब्रुवारी रोजी सुरुवात झली असून हे काम २४ लक्ष १२ हजार ६०० रुपयाचे आहे. १८ ते २४ फेब्रुवारी दरम्यान या कामावर १९५३ मनुष्य दिवस निर्मित झाले असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी आर.टी. शिंदे यांनी यावेळी दिली.यावेळी आयुक्तासमवेत जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गावडे, उपवनसंरक्षक जितेंद्र रामगावकर, उपजिल्हाधिकारी (रोहयो) आर.टी. शिंदे, उपविभागीय अधिकारी सुनिल सूर्यवंशी, तहसिलदार सांगडे, गटविकास अधिकारी मोटघरे, विस्तार अधिकारी राठोड, सहायक लेखा अधिकारी (रोहयो) कुलदीप गडलींग यांची उपस्थिती होती