जिल्ह्यातील ३४८ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज

0
24

*जिल्ह्यातील ३४८ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज*
मतदान साहित्यासह पोलिंग पार्टी रवाना
*रविवार १८ डिसेंबरला मतदान*
सरपंच व ग्रामपंचायत सदस्य पदासाठी निवडणूक
सरपंच पदासाठी १००७ तर सदस्य पदासाठी ६२१० उमेदवार
गोंदिया दि. १७- माहे ऑक्टोबर २०२२ ते माहे डिसेबर २०२२ या कालावधीत मुदत संपणा-या ग्रामपंचायतीं, नव्याने स्थापीत तसेच समर्पित आयोगाच्या अहवालात दिसत नसल्यामुळे मागील निवडणूकांमधून वगळलेल्या ग्रामपंचायतींच्या (सदस्य पदासह थेट सरपंच पदाच्या) सार्वत्रिक निवडणूकांसाठी संगणकप्रणालीव्दारे राबविण्याचा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रमा नुसार गोंदिया जिल्हयातील ३४८ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकींकरीता रविवार १८ डिसेंबर २०२२ रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज झाली असून निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली आज पोलिंग पार्टी मतदान साहित्यासह रवाना झाल्या आहेत.
जिल्ह्यातील ३४८ ग्रामपंचायतीच्या ३०२२ ग्रामपंचायत सदस्य पदासाठी व ३४८ सरपंच पदासाठी ही निवडणूक होत आहे. सरपंच पदासाठी १००७ तर सदस्य पदासाठी ६२१० असे एकूण ७२१७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. ग्रामपंचायत सदस्य पदासाठी गोंदिया १६२३, गोरेगाव ५११, अर्जुनी मोरगाव ६६७, देवरी ३६७, सडक अर्जुनी ६६४, सालेकसा ४९५, आमगाव ५७८ व तिरोडा १३०५ असे एकूण ६२१० उमेदवार निवडणूक लढवित आहेत. तर सरपंच पदासाठी गोंदिया २३१, गोरेगाव ६८, अर्जुनी मोरगाव १३३, देवरी ७९, सडक अर्जुनी १२६, सालेकसा ८२, आमगाव ८० व तिरोडा २०८ असे एकूण १००७ उमेदवार निवडणूक लढवित आहेत. ही निवडणूक जिल्ह्यातील आठ तालुक्यातील १०८२ वार्डमध्ये घेण्यात येत आहे.
रविवार १८ डिसेंबर रोजी सकाळी ०७.३० ते सायंकाळी ०५.३० मतदानाची वेळ आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सालेकसा तालुक्याकरीता मतदानाची वेळ सकाळी ०७.३० ते दुपारी ०३.०० पर्यंत आहे. तथापी राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार ग्रामपंचायत दरेकसा ता. सालेकसा, जिल्हा – गोंदिया मधील मतदान केंद्र क्रमांक ०२ मुरकुटडोह येथील मतदान केंद्रातील मतदान केंद्रावर मतदानाची वेळ सकाळी ०७. ३० ते दुपारी ०२. ०० वाजता करण्यात आली आहे.

*ग्रामपंचायत मतदानासाठी सुट्टी*
ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी ग्रामपंचायत क्षेत्रातील मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. उद्योग, उर्जा व कामगार विभागाअंतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यादींना ही सुट्टी लागू राहील. (खाजगी कंपन्यामधील आस्थापना, सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्नगृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स, रिटेलर्स इत्यादी)
अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी इत्यादींना पुर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी कमीत कमी दोन तासांची सवलत देता येईल. कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन तासांची सवलत मिळेल, याची दक्षता संबंधित आस्थापना मालकांना देणे आवश्यक राहील, असे आदेश कामगार विभागाने दिले आहेत.
00000