दोघा लाचखोर लाईनमनला कारावास

0
7

गोंदिया  दि.११: वीज चोरीचा गुन्हा दाखल न करण्याप्रकरणी लाच स्वीकारतान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या हाती लागलेल्या दोघा लाईनमेनला न्यायालयाने पाच वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. सन २00४ मधील या प्रकरणात न्यायालयाने गुरूवारी (दि.१0) निर्णय सुनावला आहे.
सविस्तर असे की, तक्रारदार (रा.बलमाटोला) हे शेतकरी असून आरोपी लाईनमेन सुनिल अमृत घरडे (२२) व बाळा मारोती तांडेकर (५४) यांनी त्यांच्या शेतातील पाणी देण्याचे स्टार्टर व तार नेले होते. दोघांनी तक्रारदारास साहीत्य परत करण्यासाठी तसेच वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यासाठी एक हजार ४00 रूपयांची मागणी केली होती. यावर तक्रारदाराने ६ नोव्हेंबर २00४ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली होती.
तक्रारीच्या आधारे पथकाने ८ नोव्हेंबर रोजी वीज वितरण कंपनीच्या काटी येथील कार्यालयात सापळा लावून दोघा लाईनमेनला लाच स्वीकारताना रंगेहात पकडले होते. दोघांवर ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम ७,१२,१३(१)(ड) सहकलम १३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रकरणाचा तपास पूर्ण करून दोघांविरूद्ध विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते.
प्रकरणी गुरूवारी (दि.१0) विशेष न्यायाधीश एस.आर.त्रिवेदी यांनी निर्णय सुनावत कलम ७ अंतर्गत पाच वर्ष सश्रम कारावास व प्रत्येकी दोन हजार रूपये दंड तसेच दंड न भरल्यास एक महिना साधा कारावासाची शिक्षा सुनावली. याशिवाय कलम १३ (१)(ड) अंतर्गत दोघांना पाच वर्षांचा कारावास व प्रत्येकी दोन हजार रूपये दंड आणि दंड न भरल्यास एक महिना साधा कारवासाची शिक्षा सुनावली आहे.