कलार समाज रस्त्यावर :अमानुष मनुस्मृतीचे दहन

0
12

नागपूर : मानवाला मानव म्हणून नाकारणार्‍या अमानुष मनुस्मृतीचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वप्रथम दहन केले. तेव्हा बहुजन समाजातील जी कुणी व्यक्ती मनुस्मृतीचे वाचन करेल, तो तिला जाळल्याशिवाय राहणार नाही, असेही त्यांनी सांगितले होते. त्यांचे ते म्हणणे अनेकदा खरे ठरले. आज पुन्हा त्याचा प्रत्यय आला. जैन कलार समाजातर्फे गुरुवारी सायंकाळी मराठी भाषांतरित सार्थ श्रीमनुस्मृतीचे दहन करण्यात आले.
महाराष्ट्रात बंदी असलेल्या मनुस्मृतीचे मराठी भाषांतर विष्णुशास्त्री बापट यांनी केले असून पुणे येथील राजेश प्रकाशनने ते पुस्तक प्रकाशित केले आहे. राज्यातील अनेक पुस्तकालयात उपलब्ध आहे. यावर लोकमतने ९ मार्च रोजीच्या अंकात विशेष वृत्त प्रकाशित करून लक्ष वेधले होते. हे वृत्त प्रकाशित होताच सर्वत्रच याचा निषेध केला जात आहे. विविध समाज संघटनाकडून याचा निषेध केला जात आहे. विधिमंडळातही यावर आवाज उचलण्यात आला आहे. अखिल भारतीय सर्ववर्गीय कलार समाजातर्फे गुरुवारी सायंकाळी कलार समाज सांस्कृतिक भवन रेशीमबाग येथे या मराठी भाषांतरित मनुस्मृतीचे दहन करण्यात आले.
कलार समाजासह बहुजन समाजातील सर्वच जाती धर्माबद्दल अतिशय विषारी लेखन असलेल्या या मनुस्मृतीचा निषेध करीत याचे मराठी भाषांतर करणार्‍या लेखकासह प्रकाशक व वितरकांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना तातडीने अटक करावी, अशी मागणी करण्यात आली. शासनाने ही मागणी मान्य न केल्यास कलार समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशारासुद्धा यावेळी देण्यात आला. मनुस्मृतीचे मराठी भाषांतर करणार्‍याविरुद्ध समाजातर्फे लवकरच पोलिसात तक्रार दाखल केली जाईल. वेळ पडली तर न्यायालयातही याचिका दाखल करू, असेही यावेळी सांगण्यात आले. अ. भा. सर्ववर्गीय कलार समाजाचे अध्यक्ष भूषण दडवे यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या या आंदोलनात कार्याध्यक्ष डॉ. राजाभाऊ दुरुगकर, प्रा. रमेश कोलते, नारायण टाले, अँड. सूर्यकांत जयस्वाल, डॉ. बी.आर. काकपुरे, फाल्गुन उके, विजय हरडे, विजय चौरागडे, मारोतराव शनिवारे, नरेंद्र वासेकर, डायाभाई मेहरे, किशोर शिवहरे, खेमचंद राय, रमेश जायस्वाल, दमोधर दियेवार, मोहन सोनवने, ओंकार सूर्यवंशी आदींचा समावेश होता.