जल जागृती सप्ताहातून पटवून दिले जाणार पाण्याचे महत्व

0
68

* विविध उपक्रमांचे आयोजन
* जाणिव जागृतीमधून पाणी बचतीचा संदेश
* पाणी बचतीसाठी वॉटर रन

गोंदिया दि.११- राज्यातील पाणी टंचाईची परिस्थिती बघता राज्यातील पाणी नियोजन व पाण्याबद्दल जनतेमध्ये जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने १६ मार्च ते २२ मार्च २०१६ या कालावधीत राज्यभर जल जागृती सप्ताह साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. पाण्याची उपलब्धता, पाण्याचा अपव्यय टाळणे, पाण्याचा काटकसरीने वापर करणे, पाण्याचे प्रदुषण रोखणे व पाण्याबाबत शासनाची धोरणे इत्यादीबाबत जनतेमध्ये जागृती निर्माण व्हावी यासाठी जल सप्ताहाचे आयोजन करण्यात येणार आहे. या जल सप्ताहाची सुरुवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते केली जाणार आहे.
दिवसेंदिवस कमी होणारा पावसाळा तसेच वारंवार निर्माण होणारी पाणी टंचाई पाहता पाण्याचा काटकसरीने वापर व पाण्याचे नियोजन काळाची गरज झाली आहे. यासाठी समाजात व जनतेमध्ये जागृती करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. १६ ते २२ मार्च या कालावधीत होणा-या जल सप्ताहात विविध कार्यक्रमाचे आयोजन करुन पाण्याबाबत जागृती करण्यात येणार आहे. पाण्याचा अपव्यय टाळणे, पाणी मोजून घेणे, पाणी मोजमाप यंत्र बसविणे व पाणी पट्टी संबंधी माहिती देणे असे कार्यक्रम आखण्यात आले आहेत. जल सप्ताह संपूर्ण राज्यभर जलसंपदा विभागामार्फत राबविण्यात येत असला तरी या कार्यक्रमात शासनाच्या सर्व विभागांना सामावून घेण्यात येत असल्याचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
पाण्याचे महत्व पटवून देण्यासाठी आठवडाभर विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. पाण्याविषयी कथाकथन, कविता वाचन, लघूनाटय, जलसाहित्य संमेलन व सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेमध्ये जलजागृती करण्यात येणार आहे. पाणी, पाण्याची गुणवत्ता, स्थानिक सिंचन प्रकल्प, सिंचन व्यवस्थापन यंत्रणा व त्यांची कार्यपध्दती याबद्दल विद्यार्थ्यांमध्ये जागृती करण्यात येणार आहे. शाळा, महाविद्यालय यामध्ये विविध स्पर्धा व कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे गावोगावी पाण्याचे महत्व पटवून देणारे मेळावे, किर्तन व पथनाटय आयोजित करुन जल जागृती करण्याच्या शासनाच्या सुचना आहेत.
जल सप्ताहाचा एक भाग म्हणून वॉटर रन किंवा जल दौड आयोजित केली जाणार आहे. ही अभिनव कल्पना असून आपल्या कॉलनीत, शाळेत, महाविद्यालयात जल दौडचे आयोजन करुन पाणी वाचविण्याचा संदेश, पाण्याचा जपून वापर करणे व पाण्याचे महत्व समजावून सांगता येईल.
१७ फेब्रुवारी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयात जल सप्ताहात करण्यात येणा-या कार्यक्रमाची रुपरेषा आखून देण्यात आली आहे. १६ मार्च रोजी जिल्हयातील प्रमुख नदयातील पाण्याचे जलपुजन, १७ ते २१ मार्चला लाभक्षेत्रातील प्रत्येक गावात कार्यशाळा, २० मार्चला पाणी वापर संस्था व लाभ धारकांच्या कार्यशाळा व २२ मार्च रोजी महिला मेळावा, कार्यशाळा व समारोप असा हा कार्यक्रम असणार आहे. शासनाच्या या जल सप्ताहात सर्वांनी सहभागी झाल्यास पाणी बचतीचा संदेश जनाजनार्पंत पोहचविण्यास मदत होणार आहे.