राका बोअरवेल प्रकरण-तीन दिवसानंतर पालकमंत्र्यांची कुटूंबियाची भेट

0
14

सडक अर्जुनी, दि.१२-तालुक्यातील राका येथील चांदेवार यांच्या शेतातील उघड्या बोअरवेलमध्ये ९ मार्च रोजी पडलेल्या सव्वा तीन वर्षीय विवेक खुशाल दोनोडे या बालकाला काढण्याचे काम युध्दपातळीवर सुरुच आहे. यासाठी पुणे येथून आलेल्या एनडीआरएफच्या टिमचे १० सदस्य दिवसरात्र मेहनत घेत आहे.आज १२ मार्च रोजी  तब्बल तीन दिवसानंतर पालकमंत्री रा.सु. बडोले यांनी घटनास्थळी भेट देऊन सुरु असलेल्या कामाची पाहणी केली. जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यंवशी व एनडीआरएफचे पोलीस निरीक्षक हरी दास साहू यांच्याकडून माहिती जाणून घेतली.
विवेक पडलेल्या बोअरवेलच्या बाजूला समांतर पोकलॅन्ड व जेसीबीच्या सहाय्याने रात्रंदिवस खड्डा करण्याचे काम सुरु असून जवळपास ५५ फुट खड्डा खोदण्यात आला असून आणखी २० फुट खड्डा खोदण्यात येणार आहे. त्यानंतर विक्कीला काढण्याचे काम करण्यात येईल. जवळपास २४ तासाचा कालावधी आणखी लागण्याची शक्यता असल्याची माहिती श्री साहू यांनी दिली. जिल्हा प्रशासन व पोलिस विभाग घटनास्थळावर सातत्याने लक्ष ठेवून असून एनडीआरएफच्या चमुला आवश्यक ते सहकार्य यांचेकडून वेळोवेळी करण्यात येत असल्याची माहिती एनडीआरएफचे पोलीस निरीक्षक श्री साहू यांनी दिली.
पालकमंत्र्यांनी घटनास्थळानंतर  दोनोडेच्या घरी भेट दिली. कुटूंबियाकडून विक्की व त्यांच्या कुटूंबियाबाबतची माहिती पालकमंत्र्यांनी जाणून घेतली. मुख्यमंत्री सहायता निधीतून विक्कीच्या परिवाराला २ लक्ष रुपये देण्यात येईल असेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
विक्की व विवेक हे दोघे जुळे भाऊ असून ते दोघेही ३ वर्ष ३ महिन्याचे आहेत. साहिल हा मोठा भाऊ ६ वर्षाचा आहे. हे दोघे जुळे भाऊ अंगणवाडी शिक्षण घेत आहेत. अशी माहिती त्यांच्या पालकांनी दिली. विवेकचे वडील खुशाल दोनोडे हे भूमीहीन असून मजूरीचे काम करुन कुटूंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यामुळे या कूटूंबाला भरीव मदत मिळाली पाहिजे अशी अपेक्षा राकाचे सरपंच श्री दोनोडे यांनी पालकमंत्र्यांकडे व्यक्त केली. विशेष म्हणजे ते ओबीसी प्रवर्गतील आहेत,हे विसरता कामा नये.
घटनास्थळी व दोनोडे यांच्या घरी पालकमंत्र्यांच्या भेटीप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यंवशी, पोलीस अधीक्षक शशीकुमार मीणा, अपर पोलीस अधीक्षक डॉ. संदिप पखाले, भाजपाचे जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, माजी आमदार दयाराम पटले, प.स. सभापती कविता रंगारी , जि.प.सदस्य माधूरी पातोडे, प.स.सदस्या गिरीधारी हत्तीमारे, उपविभागीय अधिकारी सुनिल सूर्यवंशी, उपविभागीय पोलीस अधिकारी देवीदास ईलमकर, परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक मंदार जवळे, तहसिलदार श्री परळीकर, बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता शरद क्षत्रिय, झामसिंग येरणे यांच्यासह महसूल, पोलीस व अन्य विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.