जलयुक्त शिवार अभियान हा जल समस्येवरील पर्याय नाही

0
10

भंडारा : जलयुक्त शिवार अभियान हा देखावा असून सिंचन समस्येवर पर्याय नाही. हे अभियान वाईट आहे, असे आमचे म्हणने नाही. परंतु या अभियानातून हरितक्रांती होईल, अशी चिन्हे नाहीत. या अभियानातून एका वर्षात २४ टीएमसी पाणी साठविल्याचा मुख्यमंत्र्यांचा दावा धादांत खोटा असल्याचा आरोप राष्ट्रवादी किसान सभेचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांनी पत्रपरिषदेत केला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे किसान सभेचे उपाध्यक्ष किशोर माथनकर, प्रदेश सचिव धनंजय दलाल, जिल्हाध्यक्ष मधुकर कुकडे, विनोद हरिणखेडे, धनराज साठवणे उपस्थित होते.
यावेळी ते म्हणाले, सध्या चालू वर्षात विदर्भात उर्वरित राज्याच्या तुलनेत पाऊस बर्‍यापैकी असतांना कापूस, सोयाबीन, धान संत्री आदी नगदी पिकाचे भाव पडल्याने व सरासरी एकरी उत्पादनात घट आल्यामुळे व नापीकीमुळे विदर्भातील शेतकरी कधी नव्हे एवढा अडचणीत आला असुन आणी सरकारचे दुर्लक्ष झाल्यामुळे परिस्थिती वाईट झाली असल्याचा आरोपही त्यांनी केला.

विदर्भात शेतकर्‍यांच्या आत्महत्या वाढत असतांना त्याचे वरिष्ठ नेते चूकीचे बोलून शेतकर्‍यांची चेष्ठा व मस्करी करतात. मुख्यमंत्री शेतकर्‍याचे कर्ज माफ करणार नाही, अशी ठाम भुमिका घेतात व व्यापार्‍यांना मात्र सवलती देऊन मदत करतात. याबाबी शेतकरी विरोधी भुमिका असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे विदर्भातील जनतेवर आपलीच मानसं आपलीच माती करायला निघालेत अशी भावना झाली आहे. यासाठी भविष्यात शेतकर्‍यांनी एकत्र येऊन व्यापक लढा या अन्याया विरोधात उभा करावा लागेल. त्याची सुरुवात न्यायालयाच्या माध्यमातून आपली लेखी कैफीयत पोस्टाद्वारे प्रत्येक शेतकरी शेतमजुरांनी आपल्या गावागावातून उच्च न्यायालयाकडे पाठवावे, असे आवाहनही शंकर धोंडगे यांनी केले.