बंजारा समाजाने क्रांतिसन्मूख व्हावे-प्रशांत वंजारे

0
10

प्रकाश राठोड यांच्या ग्रंथाचे थाटात प्रकाशन

आर्णी-बंजारा समाज हा मूलतः इहवादी जाणीवेचा समूह असून त्यांच्या पुढे बुद्धानुयायी संतश्रेष्ठ सेवालाल महाराजांचा आदर्श आहे. त्यामुळे बंजारा समूहाने कुठल्याही प्रकारच्या श्रद्धा आणि अंधश्रद्धेला बळी न पडता क्रांतिसन्मूख होऊन वैज्ञानिक जाणिवांचा अंगिकार करावा असे आवाहन भटक्या विमुक्त जमाती संघटनेचे विदर्भ प्रदेशाध्यक्ष प्रशांत वंजारे यांनी केले. ते प्राचार्य डॉ. प्रकाश राठोड यांच्या ‘ हिंदू गोर बंजाऱ्यांचा कुंभमेळा आणि बंजारा धाटी संस्कृती ‘ या ग्रंथाच्या दुरदृष्य प्रणाली द्वारे आयोजित प्रकाशन समारंभात प्रमुख भाष्यकार म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सत्यशोधक विचारवंत डॉ. शाम मुडे हे होते.

‘हिंदू गोर बंजाऱ्यांचा कुंभमेळा आणि बंजारा धाटी संस्कृती ‘ या पुस्तकावर भाष्य करताना वंजारे पुढे म्हणाले की, बंजारा समाजाच्या अत्यंत काळजीतून लेखक प्रकाश राठोड यांनी हे पुस्तक साकार केले आहे. सेक्युलर असणाऱ्या बंजारा समाजाचे हिंदूकरण करण्याचे धर्मांध लोकांचे षडयंत्र हाणून पाडले पाहिजे. बंजारा समाजाने धार्मिक कर्मकांडात न अडकता आपली पुर्वाश्रमीची धाटी संस्कृती अबाधित ठेवून कुंभमेळ्यात नव्हे तर संविधान मेळ्यात सहभागी व्हावे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पुस्तक पोहोचले पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक ग. ह. राठोड यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी अंबरसिग चव्हाण, विजय जाधव, लेखक प्रकाश राठोड यांनी समायोचीत विचार व्यक्त केले. प्रास्ताविक सर्जनादित्य मनोहर, संचालन रमेश राठोड यांनी तर आभार प्रदर्शन ताराचंद चव्हाण मानले.