विद्यार्थ्यांनो, डॉ.आंबेडकरांचा आदर्श पूढे ठेवून वाटचाल – पालकमंत्री बडोले

0
6

गोंदिया,दि.२८ : डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा हा मुलमंत्र दिला. विद्यार्थ्यांनी डॉ.आंबेडकरांचा आदर्श पूढे ठेवून विकासाचा मार्ग प्रशस्त करावा. असा मौलीक सल्ला पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिला.आज २८ मार्च रोजी सामाजिक न्याय भवनातील सभागृहात त्यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा शासकीय ग्रंथालयात स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्याथी व इंजि.राजकुमार बडोले सोशल फोरम गोंदिया यांच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन केले. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री बडोले उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गावडे, गोंदिया नगराध्यक्ष कशिश जायसवाल, जि.प.समाज कल्याण समिती सभापती देवराव वडगाये, समाज कल्याण सहायक आयुक्त मंगेश वानखेडे जिल्हा शल्यचिकित्सक रवी धकाते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.हरीष कळमकर, जिल्हा ग्रंथालय अधिकारी खुमेंद्र बोपचे, जिल्हा नियोजन अधिकारी बकूल घाटे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.चव्हाण, धनंजय वैद्य यांची प्रमुख उपस्थिती होती.

स्पर्धा परीक्षेची विद्यार्थ्यांना तयारी करता यावी यासाठी जिल्हा शासकीय ग्रंथालयाला १५ लक्ष रुपये निधी जिल्हा नियोजन समितीकडून मंजूर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती निमित्ताने राज्यात व जिल्ह्यात विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहे. स्वातंत्र्य, समता आणि बंधूता या विचारावर प्रत्येकाने मार्गक्रमण केले पाहिजे असेही त्यांनी सांगितले.
डॉ.सूर्यवंशी यांनी, जिल्हा शासकीय ग्रंथालयात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सामाजिक भान ठेवून पालकमंत्र्यांच्या वाढदिवशी रक्तदान शिबीराचे आयोजन केल्याबद्दल विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. नोकरी लागल्यानंतरही सामाजिक भान ठेवूनच काम करावे असा सल्लाही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गावडे, समाज कल्याण सहायक आयुक्त मंगेश वानखेडे जिल्हा शल्यचिकित्सक रवी धकाते, जिल्हा ग्रंथालय अधिकारी खुमेंद्र बोपचे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या १५ विद्यार्थ्यांनी रक्तदान केले.