भारनियमनाच्या विरोधात शिवसेना उतरेल रस्त्यावर

0
7

भंडारा : शेतातील धान गर्भावर आला आहे. अशात त्याला पाण्याची आवश्यकता असताना वीज वितरण कंपनीने भारनियमनाचा बडगा उगारला आहे. याविरोधात शिवसेना रस्त्यावर उतरेल अशा इशारा शिवसेना जिल्हा प्रमुख राजेंद्र पटले यांनी दिला आहे. वीज कंपनीचा निषेध करण्याकरिता १ एप्रिलला तुमसर बंदचे आयोजन करण्यात आल्याची माहिती दिली.
शेतातील धानाची रोवणी झाली तेव्हा भारनियमन बंद होते. सध्या उन्हाळय़ाच्या दिवसात पाण्याची पातळी खालावत चालली असताना व नागरिकांना त्याची गरज असताना वीज वितरण कंपनीने याकडे डोळेझाक केले आहे.
तुमसर तालुक्यासह जिल्हय़ात भारनियमनाने सर्व सामान्य नागरिकांसह शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे वीज वितरण कपंनीने जिल्हय़ातील भारनियमन त्वरित बंद करावे अशी मागणी पटले यांनी केली आहे. जिल्हय़ातील ३७१ गावे दुष्काळग्रस्त घोषित झाली असताना वीज कंपनीने घेतलेली भारनियमनाची भूमिका असंतोष रुजविणारी आहे.