महिला सक्षमीकरणासाठी समाजातील सर्व घटकांनी पुढाकार घ्यावा – सीमा पाटणे

0
20

गोंदिया, दि.8 : महिलांचे संरक्षण आणि सक्षमीकरणासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरु आहेत. समाजातील सर्व घटकांनीही या कार्यात पुढाकार घ्यावा, असे आवाहन नायब तहसिलदार सीमा पाटणे यांनी केले.महिला आर्थिक विकास महामंडळ गोंदिया अंतर्गत 8 मार्च रोजी नविन प्रशासकीय इमारत गोंदिया येथे जागतिक महिला दिन कार्यक्रम साजरा करण्यात आला, त्यावेळी त्या बोलत होत्या.

प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करुन दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. तद्नंतर उपस्थित सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

         कार्यक्रमास नायब तहसिलदार सीमा पाटणे, नेहरु युवा केंद्राच्या युवा अधिकारी श्रृती डोंगरे, सामाजिक कार्यकर्त्या सविता बेदरकर, पोलीस मुख्यालय गोंदियाच्या शोभा टेकाम, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी संजय संगेकर, सहायक जिल्हा समन्वय अधिकारी सतीश मार्कंड, जिल्हा सांख्यिकी अधिकारी रुपेश राऊत, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी हिंदुराव चव्हाण, जिल्हा माहिती कार्यालयाचे माहिती सहायक के.के.गजभिये व महाराष्ट्र हेड J-FARM चे संजय अहिरवार यावेळी उपस्थित होते.

         महिलांनी आर्थिकदृट्या सक्षम होण्यासाठी शासन स्तरावर विविध योजना व उपक्रम राबविण्यात येतात. 8 मार्च जागतिक महिला दिनानिमीत्त सर्वांनी महिलांचे सक्षमीकरण करण्याचा संकल्प करुया असे प्रास्ताविकातून माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी संजय संगेकर यांनी सांगितले.

         कार्यक्रमाचा विशेष भाग म्हणून गोंदिया शहरामध्ये मोटार सायकल रॅली काढण्यात आली. सदर रॅलीची सुरुवात नविन प्रशासकीय इमारत गोंदिया येथून करण्यात येऊन गांधी प्रतिमा ते गोरेलाल चौक ते जमनालाल बजाज पुतळा ते जयस्तंभ चौक गोंदिया या मार्गाने रॅली काढण्यात आली. जिल्ह्यातून वेगवेगळ्या तालुक्यातील सी.एम.आर.सी. व्यवस्थापक, माविम सहयोगिनी, तालुकास्तरावरील अधिकारी व कर्मचारी तसेच बचतगटाच्या महिला मोटार सायकल रॅलीमध्ये सहभागी झाल्या होत्या. नायब तहसिलदार सीमा पाटणे व इतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सदर रॅलीला हिरवी झेंडी दाखवून शहरातून जनजागृतीपर रॅली काढण्यात आली.

          कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माविमचे सहायक जिल्हा समन्वय अधिकारी सतीश मार्कंड, लेखाधिकारी योगेश वैरागडे, सहायक सनियंत्रण अधिकारी प्रदिप कुकडकर, सहाय्यक प्रफुल अवघड, एमआयएसचे रामेश्वर सोनवाने, उपजिविका सल्लागार हेमंत मेश्राम, एमआयएस सल्लागार तृप्ती चावरे, व्यवस्थापक मोनिता चौधरी व उत्कर्ष लोकसंचालित साधन केंद्र गोंदिया यांनी परिश्रम घेतले.