सेवानिवृत्त कर्मचाèयांनी मांडली व्यथा : सोमवारपासून जिल्हाकचेरीसमोर बेमुदत उपोषण

0
7
गोंदिया, ता. २ :  पालकमंत्री, जिल्हाधिकारी, नगरपालिकेचे मुख्याधिकारी, नगराध्यक्ष यांना वारंवार निवेदन देऊन कार्यालयाचे उंबरठे झिजविले. परंतु, अजुनही थकीत सेवानिवृत्त वेतनावर तोडगा निघाला नाही. त्यामुळे आमच्यावर उपासमारीची पाळी आली आहे. अशी व्यथा मांडत तिरोडा नगरपालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचाèयांनी सोमवारपासून (ता. ४) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणावर बसण्याचा इशारा दिला आहे.
 बेमुदत उपोषण कास्ट्राईब कर्मचारी ‘हासंघाच्या बॅनरखाली करण्यात येणार आहे.
तिरोडा नगरपरिषदेच्या २० सेवानिवृत्त कर्मचाèयांना जानेवारी २०१३ पासून सेवानिवृत्ती वेतन देण्यात आले नाही. हे सेवानिवृत्त वेतन देण्यात यावे, याकरिता उतरत्या वयाकडे वाटचाल करीत असलेल्या सेवानिवृत्त कर्मचाèयांनी एक नव्हे तर, अनेकदा नगरपरिषदेला निवेदन दिले. कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या वतीनेही १० जून २०१५, १८ ऑगस्ट २०१५, २८ ऑगस्ट २०१५, १० डिसेंबर २०१५, १४ जानेवारी २०१६, २२ जानेवारी २०१६ आणि ६ फेब्रुवारी २०१६ ला थकीत वेतनासंदर्भात जिल्हाधिकाèयांना निवेदन देण्यात आल्याचे कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष सतीश बन्सोड यांनी सांगितले. या निवेदनाच्या प्रतीलिपी पालकमंत्री राजकुमार बडोले, तिरोडाचे नगराध्यक्ष, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना देण्यात आल्या. निवेदनानंतर मुख्याधिकाèयांना विचारले असता, नगरपरिषदेला उत्पन्नाचे साधन नाही, त्यामुळे सेवानिवृत्ती वेतनाचे प्रकरण अडगळीत पडल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले, असे बन्सोड म्हणाले.  पालकमंत्री बडोले यांच्या स्वीय सहायकांकडूनही उलट उत्तर मिळाल्याचे ते म्हणाले.  दरम्यान, जानेवारी २०१६ पासून थकीत वेतन देण्यात यावे, जानेवारी २०१५ पासूनचे थकीत महागाई भत्ते रोखीने प्रदान करण्यात यावे, सहाव्या वेतन आयोगाची थकीत रक्कम सर्व सेवानिवृत्त कर्मचारी व कार्यरत कर्मचाèयांना प्रदान करण्यात यावी, सेवानिवृत्त कर्मचाèयांची अंशदान राशी, रजा रोखीकरण त्वरित देण्यात यावे आदी मागण्यांसाठी उपोषणाचे हत्यार उपसण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.  येत्या सोमवारी गंगाबाई नारायण कटंगकार (वय ६३), देवकाबाई गवतू तुमसरे (वय ६४), शिलाबाई दिनदयाल तितिरमारे (वय ५२), आय. आर. डोंगरे (वय ६२) व अशोक हरीदास टेंभेकर (वय ६१)  आदी सेवानिवृत्त कर्मचारी उपोषणावर बसणार आहेत.
पत्रकार परिषदेला कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष सतीश बन्सोड, सेवानिवृत्त कर्मचारी देवाजी बन्सोड, के. एम. केकडे, डी. के. मेश्राम, कास्ट्राईब कर्मचारी महासंघ तिरोडाचे अध्यक्ष एम. आर. परिहार, उपाध्यक्ष आय. आर. डोंगरे, जिल्हा सचिव एस. डी. महाजन, विनोद मेश्राम, जे. एन. खोब्रागडे, राहुलकर, डब्ल्यू. एम. मेश्राम, किरण फुले उपस्थित होते.