आ.रहांगडालेच्या प्रयत्नामुळे नगर पालिकेला ९ कोटींचा निधी

0
7

तिरोडा : तिरोडा-गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांच्या प्रयत्नामुळे नगर पालिकेला चालू वित्तीय वर्षात नऊ कोटी ८९ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला असून पालिकेच्या खात्यात हा निधी जमा झाला आहे. लवकरच याची निविदा काढण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष अजयसिंह गौर यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
तिरोडा नगरपरिषद ‘क’ श्रेणीत असून घर कर वगळता आर्थिक आवकसाठी अन्य स्त्रोत जवळपास नगण्य आहे. त्यामुळे मिळालेल्या या निधीचा मोठय़ा प्रमाणात हातभार लागणार आहे. मिळालेल्या नऊ कोटी ८९ लाख रुपयांपैकी चार कोटी ७१ लाख रुपये वैशिष्टपूर्ण निधी अंतर्गत बहुद्देशीय सभागृहाच्या बांधकामाकरिता उपलब्ध झाले आहे. हे सभागृह दोन मजली राहणार असून प्रत्यक्ष बांधकामावर तीन कोटी ८0 लाख रुपये वापरण्यात येणार असून इतर बाबींकरीता उर्वरीत निधी वापरण्यात येणार आहे.
एक कोटी ७0 लाख रूपये वैशिष्टपूर्ण निधी अंतर्गत तरणतालाच्या बांधकामाकरिता आहेत. आजतागायत शहरामध्ये खाजगी व सरकारी कुठल्याही प्रकारचे तरणताल उपलब्ध नाही. त्यामुळे आधुनिक पध्दतीचे तरणताल तिरोडावासीयांकरिता निर्माण केले जाणार आहे. दलितोत्तर विकास निधी अंतर्गत ९२लाख रुपये प्राप्त झाले असून यामध्ये पोलीस स्टेशन ते मोहनलाल चौक असा ७00मीटरचा दुपदरी रस्ता दुभाजक, भूमीअंतर्गत नाल्या, पादचारी मार्ग विद्युतीकरणासह बांधण्यात येणार आहे. अल्पसंख्याक विकास निधी अंतर्गत मुस्लीमटोला येथे शादीखाना बांधकामाकरिता ५६लक्ष रुपये प्राप्त झाले आहे. तसेच रस्ता अनुदान निधी अंतर्गत दोनकोटी रुपयांतून डांबरी रस्त्यांचे बांधकाम करण्यात येणार आहे.