जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा – खा.नाना पटोले

0
17

गोंदिया,दि.5 : शेतकऱ्यांना नेहमी नैसर्गिक आपत्ती किंवा कृषि मालाच्या बाजारपेठेतील किंमतीत चढ-उताराची काळजी असते. शेतकऱ्यांसाठी सोपी, सोईची व फायदयाची अशी पंतप्रधान पीक विमा योजना आहे. ही योजना म्हणजे शेतकऱ्यांसाठी सुरक्षा कवच आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा. असे आवाहन खासदार नाना पटोले यांनी केले.
आज ५ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात कृषि विज्ञान केंद्र हिवरा व ‍कृषि विभाग गोंदिया यांच्या संयुक्त वतीने पंतप्रधान पिक विमा योजनेबाबत जनजागृती कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून खा.पटोले बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, एसबीआय जनरल इन्श्यूरन्स कंपनी नागपूरचे अजय पांडे, देवरीचे उपविभागीय कृषि अधिकारी युवराज शहारे, गोंदियाचे उपविभागीय कृषी अधिकारी श्री.नयनवाड, जिल्हा अग्रणी बँकेचे प्रबंधक अनिलकुमार श्रीवास्तव, जिल्हा उपनिबंधक दिग्वीजय आहेर प्रामुख्याने उपस्थित होते.
खा.पटोले पुढे म्हणाले, पिक विम्यावर सकारने दिलेले आजवरचे हे सर्वाधिक अर्थसहाय्य आहे. परिणामी यामध्ये शेतकऱ्यांसाठी विम्याचा दर फार कमी आहे. उर्वरित रकमेचा बोजा ९० टक्क्याहून अधिक असेल तरीही त्याचा भार शासन उचलणार आहे. खाद्यान्न, डाळी आणि तेलबियांसाठी विम्याचा दर एक हंगाम एक दर असेल. खरीपासाठी २ टक्के व रब्बीसाठी १.५ टक्के व नगदी पिकांसाठी ५ टक्के असा शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हफ्ता दर आहे.
स्थानिक आपत्तीच्या प्रसंगामध्ये पूरस्थिती व जलसंचय समाविष्ट करण्यात आले आहे. सुगीपश्चात चक्रीवादळ व अवकाळी पावसामुळे होणारे नुकसान देखील या योजनेत समाविष्ट करण्यात आलेले आहे. उत्पन्नाचा अचुक अंदाज आणि विम्याचे दावे वेगाने निकाली काढण्यासाठी मोबाईल आणि उपग्रह तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे.
ही योजना पुढील खरीप २०१६ हंगामापासून लागू करण्यात येईल. या योजनेत भाग घेणे सोपे आहे. पंतप्रधान पिक विमा योजना भारतीय कृषि विमा कंपनी तसेच केंद्र शासनाने मान्यता दिलेल्या दहा खाजगी विमा कंपनीच्या सहाय्याने राबविण्यात येणार असून या योजनेतून शेतकऱ्यांना सुरक्षितता मिळणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्ह्यात २ लाख ८६ हजार शेतकरी आहेत. शेतकरी मुख्य प्रवाहात आला पाहिजे. त्यासाठी यंत्रणांनी या योजनेची शंभर टक्के अंमलबजावणी करावी असे सांगितले. प्रत्येक शेतकऱ्यांनी पिक विमा काढलाच पाहिजे असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी शेतीच्या उत्पादन नुकसानाबाबत काही प्रश्न उपस्थित केले. त्यावर खा.पटोले यांनी समाधानकारक उत्तर दिले.
प्रास्ताविक कृषि विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वय डॉ.एस.एम.नवलाखे यांनी केले. संचालन कृषि विज्ञान केंद्राचे सहायक प्राध्यापक आर.पी.मांडवे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एच.एस.चव्हाण यांनी मानले. कार्यक्रमास कृषि विभागाचे अधिकारी, बँकेचे अधिकारी तसेच बहुसंख्यने शेतकरी उपस्थित होते