पाणी टंचाईवर मात करण्यासाठी उपाययोजना करा – पालकमंत्री बडोले

0
9

अर्जुनी/मोरगाव येथे आढावा सभा
गोंदिया,दि.९ : अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील ज्या गावात संभाव्य पाणी टंचाई उदभवण्याची शक्यता आहे अशा गावातील ग्रामस्थांना पाणी टंचाईचा सामना करण्याची वेळ येऊ नये यासाठी प्रशासनाने उपाययोजना कराव्यात. असे निर्देश पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिले.
आज (ता.९) अर्जुनी/मोरगाव पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित आढावा सभेत पालकमंत्री बडोले बोलत होते. सभेला माजी आमदार दयाराम कापगते, जिल्हा परिषद उपाध्यक्ष रचना गहाणे, पंचायत समिती सभापती अरविंद शिवणकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.रवी धकाते, तहसिलदार बांर्बोडे, गटविकास अधिकारी नारायण जमईवार, तालुका कृषी अधिकारी धनराज तुमडाम, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती लायकराम भेंडारकर, खरेदी विक्री संघाचे संचालक रघुनाथ लांजेवार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
पालकमंत्री बडोले पुढे म्हणाले, ज्या गावातील बोअरवेल नादुरुस्त असतील अशा बोअरवेल तातडीने दुरुस्ती करण्याचे काम हाती घ्यावे. जिथे जिथे टंचाई भासण्याची शक्यता आहे अशा गावामध्ये उपाययोजना कराव्यात. ५ एप्रिल रोजी सायंकाळी सुमारे ५ वाजता आलेल्या चक्रीवादळामुळे चान्ना, बाकटी येथील घरांचे व त्यांच्या शेतातील उभ्‍या पिकांचे नुकसान झाले आहे. अशा नुकसानग्रस्त सर्व कुटुंबांचे व शेतीचे सर्वेक्षण करुन व त्याचे पंचनामे तयार करुन वस्तुनिष्ठ अहवाल सादर करावा. नुकसान झालेल्या कुटुंबांना व शेतकऱ्यांना शासनाकडून योग्य ती मदत करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.