डॉ.पंजाबराव देशमुख यांना भारतरत्न मिळण्यासाठी प्रयत्न करणार – मुख्यमंत्री फडणवीस

0
51

अमरावती : डॉ.पंजाबराव देशमुख यांनी बहुजनांसाठी ज्ञानगंगा आणली. बहुजनांचे ज्ञानयोगी असलेल्या डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांना भारतरत्न हा सर्वोच्च बहुमान मिळण्यासाठी शासनातर्फे प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयात आयोजित भाऊसाहेबांच्या 51 व्या पुण्यतिथी सोहळ्यात केले. याच कार्यक्रमात वैद्यकीय महाविद्यालयातील नवनिर्मित ग्रंथालय इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. 

यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री प्रविण पोटे पाटील, गृहराज्यमंत्री डॉ.रणजित पाटील, आमदार सर्वश्री डॉ.सुनिल देशमुख, रमेश बुंदिले, प्रभुदास भिलावेकर, शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲड.अरुण शेळके, उपाध्यक्ष सुरेश ठाकरे, डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.डी.एस.जाणे, प्राचार्य वि. गो. भांबुरकर, कमलताई गवई, विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर, जिल्हाधिकारी किरण गित्ते, मनपा आयुक्त चंद्रकांत गुडेवार, यासह शिवाजी शिक्षण संस्थेचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते. 

डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयात 3.16 कोटी रुपयाच्या निधीमधून ग्रंथालयाची सुसज्ज अशी इमारत बांधण्यात आली असून 18,500 चौ.फुट क्षेत्रफळावर बांधकाम करण्यात आले आहे. प्रशस्त हवेशीर वाचन कक्ष, स्वतंत्र संदर्भ कक्षासह 13,593 ग्रंथाची ग्रंथ संपदा या ग्रंथालयात उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांना संशोधन कार्यासाठी उपयुक्त असे अनेक संदर्भ ग्रंथ यामध्ये उपलब्ध आहेत. 

भाऊसाहेब द्रष्टे नेते होते. वैदर्भीय जनतेच्या मनातील खरे भारतरत्न म्हणजे भाऊसाहेब असा गौरवपूर्ण उल्लेख करुन मुख्यमंत्र्यांनी ग्रंथ संपदेने विपुल असे ग्रंथालय उभारणे हीच भाऊसाहेबांना आदरांजली असल्याचे सांगितले. भाऊसाहेबांनी केलेल्या शैक्षणिक कार्यामुळेच आज अमरावती शिक्षण क्षेत्रात आघाडीवर आहे. कृषी क्षेत्रात भाऊसाहेबांनी केलेले कार्य अतुलनीय असून कृषी प्रदर्शनाची संकल्पना भाऊसाहेबांनी मांडली. दिल्लीला देशातील पहिले कृषी प्रदर्शन भाऊसाहेबांनी भरविले होत. शेतीच्या समस्या सोडविण्यासाठी शासन प्रयत्नशील असून भाऊसाहेबांच्या स्वप्नातील कृषीप्रधान भारत घडविण्याचा आमचा प्रयत्न राहील असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. शिवाजी शिक्षण संस्थेच्या संबंधित असणाऱ्या अडीअडचणी सोडविण्यासाठी लवकरच मंत्रालयस्तरावर बैठक घेण्यात येईल. शिक्षण क्षेत्रात शिक्षणाचा दर्जा वाढवल्या खेरीज उत्तम प्रतीचे मानव संसाधन निर्माण होऊ शकत नाही. म्हणून शिक्षण संस्थांनी शिक्षणाचा दर्जा वाढवावा व स्वायतत्ता मिळवावी. भाऊसाहेबांच्या नावाने अध्यासन प्रबोधिनी येथे लवकरच सुरु करण्यात येईल व त्यासाठीचा शासन निर्णय निर्गमित करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष ॲड.अरुण शेळके यांनी केले. त्यात त्यांनी भाऊसाहेबांच्या कार्याची माहिती दिली. शिवाजी शिक्षण संस्थेच्या शैक्षणिक, सामाजिक, संशोधनपर कार्याचा विस्तृतपट त्यांनी उलगडला. वैद्यकीय महाविद्यालयाच्या संबंधित असलेल्या अडीअडचणी सोडविण्यासाठी शासनाने संस्थेला सहकार्य कराव अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी संस्थेच्या शिवसंस्था या मासिकाचे विमोचन मुख्यमंत्रयांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.किशोर फुले यांनी तर आभार डॉ.डी.एस.जाणे यांनी मानले.