प्रभावी जनसंपर्काद्वारे भारतीय मूल्ये जगभरात

0
9

नागपूर दि. 22:  जी-20 परिषदेच्या आयोजनाद्वारे नागपूर शहराने जगभरात भारतीय संस्कृती व मूल्ये प्रभावीपणे पोहचवली आहेत. प्रशासनाने केलेल्या नेटक्या आयोजनास जनसंपर्काच्या विविध आयुधांद्वारे  प्रभावीपणे पोहचविल्यानेच हे शक्य झाल्याच्या भावना, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी येथे व्यक्त केल्या.

२१ एप्रिल जागतिक जनसंपर्क दिन म्हणून साजरा करण्यात येतो.नागपूर प्रेस क्लब येथे राष्ट्रीय जनसंपर्क दिनानिमित्त ‘जी-२० आणि भारतीय मूल्ये: जनसंपर्क दृष्टीकोन’ या विषयावर आयोजित कार्यक्रमात श्रीमती बिदरी बोलत होत्या. नागपूर महानगर विकास प्राधिकरणाचे महाव्यवस्थापक अविनाश कातडे, जिल्हा माहिती अधिकारी प्रविण टाके, पब्लिक रिलेशन्स सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेच्या नागपूर शाखेचे अध्यक्ष एस.पी. सिंग, सचिव यशवंत मोहिते आणि समन्वयक मनीष सोनी याप्रसंगी  उपस्थित होते.

यावेळी माहिती व जनसंपर्क विभागाचे माध्यम समन्वयक अनिल गडेकर यांचा उत्कृष्ट जनसंपर्क अधिकारी म्हणून विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

श्रीमती बिदरी यांनी पुढे सांगितले की जी-20 चे आयोजन ही नागपूर शहराला मिळालेली सुवर्णसंधी होती. पंतप्रधान दौरा, हिवाळी अधिवेशन, राष्ट्रीय सायन्स कॉग्रेसचे आयोजन, विधान परिषद शिक्षक मतदार संघाची निवडणूक या एकामागून एक येणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजनात व्यस्त असतांना अत्यंत कमी वेळात जगाच्या 85 टक्के जीडीपी सांभाळणाऱ्या देशांचा संघ जी-20 च्या बैठकीचे आयोजनातून नागपूरची प्रतिमा जगासमारे पोहचविण्याची जबाबदारी खांद्यावर आली होती. मात्र महसूल विभाग, महानगरपालिका, नागपूर सुधार प्रन्यास, मिहान, मेट्रो, नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पोलीस व इतर सर्वच विभागांनी आपसी समन्वयातून आपली जबाबदारी चोखपणे बजावत सहकार्य केले.  जी20 निमित्त नागपूरच्या सौदर्यीकरणात कायमस्वरूपी भर पडेल असे विविध शिल्पे, रंगरंगोटी, कलाकृती, आदिवासी कलादर्शन, रंगीत कारंजे व दर्शनी पायाभूत सुविधा उभारण्याचे नियोजन करण्यात आले. याचा लाभ नागपूर येथील पर्यटन वाढीसाठी निश्चितच होईल, असेही त्या म्हणाल्या.

जी-20 परिषदेत सहभागी पाहुण्यांचे पारंपरिक स्वागत, गाला डिनरच्या माध्यमातून आपली खाद्य संस्कृती व लोककलेचे प्रात्याक्षिक, यातून आपली भारतीय सांस्कृतिक मूल्ये जगासमोर मांडण्यात आली.  नागपूरची माहिती देणार फुटाळा येथील लेझर शो सारखा अद्वितीय कार्यक्रम यापुर्वी कुठेच पाहिला नाही अशी प्रतिक्रीया सी20 च्या अध्यक्षा माता अमृतानंदमयी यांनी दिल्याचे श्रीमती बिदरी म्हणाल्या.  यावेळी त्यांनी कार्यक्रमाच्या आयोजनात आलेल्या अडचणी, त्यावर केलेल्या उपाययोजना, रात्री उशीरापर्यंत होत असलेले काम याबाबतची माहिती व गमती-जमती पत्रकारांना सांगितल्या. लवकरच नागपूरच्या झिरो माईल्सची भौगोलिक स्थिती उपग्रहाच्या दृष्याद्वारे दाखविण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

जिल्हा माहिती अधिकारी प्रविण टाके यांनी जी20 निमित्त माहिती व जनसंपर्क विभागाद्वारे राबविलेल्या प्रसिद्धी मोहिमेची माहिती दिली. एस.पी.सिंग यांनी प्रास्ताविकेतून कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक महानगरपालिकेचे जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी यांनी केले तर उपस्थितांचे आभार यशवंत मोहिते यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील जनसंपर्क अधिकारी, पत्रकार, जनसंपर्क आणि पत्रकारितेचे विद्यार्थी उपस्थित होते.