ढोंगी ज्योतिषाचा अंनिसकडून भंडाफोड

0
8

भंडारा : शहरातील एका उपहारगृहातील खोलीत चमत्कार करुन लोकांना आजारमुक्त करण्याचा दावा करणार्‍या ज्योतिषाने आपले बस्तान मांडले होते. परंतु त्याचा हा गोरखधंदा यशस्वी होण्यापुर्वीच महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीने त्याचा भंडाफोड केला.
कुंडलीक पंजाबराव झुंगे (५0) रां कारकी जिल्हा यवतमाळ असे तथाकथित महाराजाचे नाव आहे. चेहरा, हस्तरेखा व छायाचित्र पाहून भविष्य सांगण्याचा दावा करणारे पत्रक त्याने शहरात वितरीत केले होते. याशिवाय पुत्रप्राप्ती, व्यापार, प्रगती, शारीरिक व्याधी, गृह पीडा, राजनैतिक वाद, कठीण समस्यांवर समाधान काढून देण्याचीही पत्रकात उल्लेख होता. त्यावर भ्रमणध्वी क्रमांक व भेटण्याची वेळ, शुल्कासह नमूद केली होती. महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे प्रधान जिल्हा सचिव मेहमुद अली यांनी जिल्हा कार्याध्यक्ष विष्णूदास लोणारे यांना याबाबत माहिती देऊन चर्चा करण्यात आली. शनिवारला, भंडारा पोलीसात तक्रार करण्यात आली. ठाणेदार जयवंत चव्हाण यांनी दखल घेत पोलीस उपनिरीक्षक संदीपान उबाळे, पोलीस कर्मचारी प्रशांत गुरव, विजय तायडे तसेच मेहमुद अली व विष्णूदास लोणारे यांना घटनास्थळी पाठविले. त्यावेळी हा ज्योतिषी आपला दरबार लावून बसला होता. प्रकृती बरी राहत नसल्याचे सांगितले असता, त्याने तंत्र-मंत्राचे उच्चारण करुन उपचार सुरु केला. दरम्यान, पुत्रप्राप्तीसाठी शनी शांत करण्याचा सल्ला दिला.
यावर विष्णू लोणारे यांनी आपली ओळख देऊन अंनिसचे पदाधिकारी असल्याचे सांगितले. कारवाई करण्याबाबत विचारणा केली असता, झुंगे याने हा माझा पिढीजात व्यवसाय असल्याची कबुली देत यापुढे लोकांची फसवणूक न करण्याचे आश्‍वासन देत माफी मागितली.