गोंदिया रेल्वे स्टेशनवर लाईफ लाईन एक्सप्रेसचे आगमन

0
7

४ ते २५ मे पर्यंत मिळणार आरोग्य सेवा
उपचार व शस्त्रक्रिया विनामुल्य

गोंदिया,दि.२६ : लाईफ लाईन एक्सप्रेसचे २४ एप्रिल रोजी गोंदिया रेल्वे स्टेशनवर आगमन झाले. आगमन प्रसंगी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.अजय केवलीया, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रवि धकाते यांनी लाईफ लाईन एक्सप्रेसमध्ये आलेल्या सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
जिल्ह्यातील गोरगरीब व गरजू लोकांसाठी वरदान ठरणाऱ्या व वैद्यकीय क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावणाऱ्या सुसज्ज अशा लाईफ लाईन एक्सप्रेसला २३ वर्षानंतर दुसऱ्यांदा गोंदियाला आणण्याचे मोलाचे कार्य जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी, डॉ.अजय केवलीया, डॉ.रवि धकाते, डॉ.हरीश कळमकर यांनी केले आहे.
वैद्यकीय सेवेने सुसज्ज अशा लाईफ लाईन एक्सप्रेसमध्ये तज्ञ डॉक्टरांची चमू राहणार आहे. हे तज्ञ डॉक्टर्स डोळ्यांचे परिक्षण व मोतीबिंद शस्त्रक्रिया, फाटलेले ओठ व भाजलेल्या शरीरावरील परिक्षण व उपचार शस्त्रक्रिया, कानावर शस्त्रक्रिया, पोलिओ शस्त्रक्रिया, दातांचे परिक्षण व उपचार, मिर्गी तपासणी व उपचार, स्त्रीरोग उपचार आदी प्रकारच्या आजाराची तपासणी, उपचार व आवश्यकता असल्यास मोफत शस्त्रक्रिया करणार आहे. लाईफ लाईन एक्सप्रेसची रुग्णसेवा ४ ते २५ मे पर्यंत जिल्ह्यातील जनतेसाठी उपलब्ध राहणार आहे. जास्तीत जास्त रुग्णांनी लाईफ लाईन एक्सप्रेसच्या रुग्णसेवेचा लाभ घ्यावा असे आरोग्य विभागाच्या वतीने कळविण्यात आले आहे.