वडेट्टीवार दाखविणार २ मे रोजी तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे

0
9

गडचिरोली, ता.३०: तेलंगणा सरकारद्वारे प्रस्तावित मेडिगट्टा-कालेश्वर धरणाचे भूमिपूजन २ मे रोजी तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांच्या हस्ते होणार आहे. याविरोधात ब्रम्हपुरीचे आमदार व प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष, काँग्रेसचे विधिमंडळातील उपनेते विजय वडेट्टीवार २ मे रोजी मेडिगट्टा येथे जाऊन तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविणार आहेत.

तेलंगणा सरकारद्वारे पोचमपल्ली येथे मेडिगट्टा-कालेश्वर धरण बांधण्यात येणार आहे. या धरणामुळे सिरोंचा तालुक्यातील २२ गावांमधील सुपिक शेतजमीन पाण्याखाली बुडणार असल्याने सुमारे १८ हजार शेतकऱ्यांच्या हातातील उत्पन्न जाईल, अशी स्थिती असून, बाजारपेठही थंडावणार आहे. शिवाय या धरणामुळे केवळ तेलंगणा राज्यालाच पूर्णपणे फायदा होणार आहे. त्यामुळे धरणाला विरोध करण्यासाठी नागरिकांनी १ व २ फेब्रुवारीला पोचमपल्ली ते सिरोंचा अशी शांतीपदयात्रा काढली होती. मात्र, नागरिकांच्या विरोधाला न जुमानता ८ मार्च रोजी तेलंगणाचे मुख्यमंत्री व महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी एका करारावर स्वाक्षरी केली. आता २ मे रोजी तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांच्या हस्ते कालेश्वर-मेडिगट्टा प्रकल्पाचे भूमिपूजन होणार असून, चंद्रशेखर राव हे चार मंत्र्यांसह २ मे रोजी सकाळी १० वाजता हेलिकॉप्टरने कन्नेपल्ली येथे पोहचणार आहेत.