आज लाईफ लाईन एक्सप्रेसच्या आरोग्य सेवेचा शुभारंभ

0
16

गोंदिया,दि.३ : जिल्ह्यातील गरजू व गोरगरीब रुग्णांना आरोग्य सेवेचा लाभ मिळावा या दृष्टीने क्युरादेव फार्मा प्रा.लि.च्या सौजन्याने राज्य सरकारच्या मदतीने आणि इम्पॅक्ट इंडिया फाऊंडेशन द्वारा संचालित लाईफ लाईन एक्सप्रेस या जगातील पहिल्या चालत्या-फिरत्या आरोग्य सेवेचा शुभारंभ ४ मे रोजी सकाळी ९ वाजता पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते लोकोशेड, रेल्वे स्टेशन पोष्ट ऑफिस जवळ, गोंदिया येथे करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकलेखा समितीचे अध्यक्ष आ.गोपालदास अग्रवाल हे असतील. प्रमुख अतिथी म्हणून जि.प.अध्यक्ष उषाताई मेंढे, खासदार सर्वश्री प्रफुल पटेल, नाना पटोले, अशोक नेते, आमदार सर्वश्री राजेंद्र जैन, नागो गाणार, प्रा.अनिल सोले, संजय पुराम, विजय रहांगडाले, गोंदिया नगराध्यक्ष कशिश जायस्वाल, जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे, जि.प.आरोग्य शिक्षण समिती सभापती पी.जी.कटरे, जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी सी.एल.पुलकुंडवार, नागपूर आरोग्य मंडळाचे उपसंचालक डॉ.संजय जायस्वाल, सार्वजनिक आरोग्य संस्था नागपूरच्या प्राचार्या डॉ.पदमजा जोगेवार यांची तर क्युरादेव फार्मा प्रा.लि.चे सहायक महाव्यवस्थापक अशोक बियाणी, इम्पॅक्ट इंडिया फाऊंडेशनचे प्रकल्प व्यवस्थापक डॉ.वैभव धाडकर यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या शुभारंभ प्रसंगी उपस्थित राहावे.
४ ते २५ मे या कालावधीत लाईफ लाईन एक्सप्रेसच्या आरोग्य सेवेदरम्यान रुग्णांची प्राथमिक तपासणी केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात करण्यात येणार आहे. रुग्णांची शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता असल्यास केटीएसमधून वातानुकूलीत रुग्णवाहिकेतून लाईफ लाईन एक्सप्रेसमध्ये रुग्णास आणण्यात येईल. रुग्ण व रुग्णाच्या एका नातेवाईकाची भोजनाची व्यवस्था करण्यात येणार आहे. लाईफ लाईन एक्सप्रेसमध्ये डोळ्यांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया, फाटलेले ओठ व भाजलेल्या शरीराच्या भागाची, कानाच्या रुग्णांवर तसेच १४ वर्षाच्या आतील पोलिओ रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात येईल. तर दातांचे विकार, मिर्गी (फिट) व स्त्रीरोगावर उपचार करण्यात येतील. यामध्ये नामवंत डॉक्टर्स रुग्णांची तपासणी करुन रोगनिदान, मोफत उपचार व आवश्यकतेनुसार शस्त्रक्रिया करतील.
जिल्ह्यातील जास्तीत जास्त रुग्णांनी लाईफ लाईन एक्सप्रेसच्या आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रवि धकाते व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.हरीश कळमकर यांनी केले आहे.