१७ ते २१ मे दरम्यान उष्णतेची लाट

0
9

नागरिकांनी काळजी घ्यावी
गोंदिया,दि.१७ : भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या सूचनेनूसार १७ ते २१ मे २०१६ या कालावधीत राज्यात उष्णतेची लाट मोठ्या प्रमाणात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी गोंदिया यांनी केले आहे.
काय करु नये
दुपारी १२ ते ३ या कालावधीत बाहेर उन्हात जाण्याचे टाळावे. गडद, घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे. लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये. बाहेर तापमान जास्त असल्यास शारिरीक श्रमाची कामे दुपारी १२ ते ३ या कालावधीत टाळावे. उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळावे. तसेच मोकळ्या हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघडी ठेवावीत. शक्यतो चहा, कॉफी, मद्य, कार्बोनेटेड थंड पेय्याचा वापर टाळावा. शिळे अन्न खाऊ नये आणि उच्च प्रथिने असलेले अन्न टाळावे.
काय करावे
तहान लागलेली नसतांनाही जास्तीत जास्त पाणी प्यावे. हलकी, पातळ व सच्छिद्र सूती कपडे वापरावेत. बाहेर जातांना गॉगल्स, छत्री/टोपीचा वापर करावा. प्रवास करतांना पाण्याची बाटली सोबत घ्यावी. बाहेर उन्हात काम करतांना टोपी किंवा छत्रीचा वापर करावा. तसेच ओल्या कपड्यांनी डोके, मान व चेहरा झाकावा. शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होत असल्याने ओ.आर.एस., घरी बनविलेली लस्सी, लिंबूपाणी, ताक इत्यादीचा वापर नियमीत करावा. अशक्तपणा, स्थूलपणा, डोकेदुखी, चक्कर येणे इत्यादी उन्हाचा झटका बसण्याची लक्षणे ओळखून तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. घर थंड ठेवण्यासाठी सनशेड, पडदे, पंखे, ओले कपडे इत्यादींचा वापर करावा. तसेच रात्री खिडक्या उघड्या ठेवण्यात याव्यात. थंड पाण्यानी स्नान करावे. कामाच्या ठिकाणी जवळच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. पहाटेच्या वेळी जास्तीत जास्त कामाचा निपटारा करावा. गरोदर महिला कामगार व आजारी कामगार यांची अधिक काळजी घ्यावी. गुरांना छावणीत ठेवण्यात यावे, तसेच त्यांना पुरेसे पाणी पिण्यास दयावे.