वैनगंगा शुद्धीकरणासाठी सरसावली विदर्भ राज्य समिती

0
15

भंडारा : जिल्ह्यातील जीवनदायीनी वैनगंगा नदी दूषित झाली आहे. नाग नदीचे पाणी तसेच इकॉर्निया वनस्पतीमुळे आरोग्य धोक्यात आले आहे. वैनगंगा नदीच्या शुद्धीकरणासाठी आता विदर्भ राज्य आंदोलन समितीनेही पुढाकार घेतला आहे. या संदर्भात मुख्य अभियंता (गोसीखुर्द) यांना समितीच्या वतीने मागण्यांचे निवेदन देण्यात आले. वैनगंगा नदीत नागनदीतील रासायनिक पाण्यामुळे प्रदूषित झाली आहे. तसेच नदीपात्रात इकॉर्निया वनस्पती मोठय़ा प्रमाणात पसरलेली आहे. हेच पाणी नगरपालिका प्रशासनाकरवी भंडारेकरांना पिण्यासाठी उपलब्ध केले जाते. परिणामी शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येवून महामारी पसरण्याची चिन्हे आहेत. वैनगंगा नदीचे दूषित पाणी नगरपालिका भंडार्‍याला जलसंपदा विभाग विक्री करते. या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष वेधण्यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समिती भंडारा तर्फे माजी आमदार आनंदराव वंजारी, मधुकर कुकडे, जिल्हाध्यक्ष अँड.प्रभाकर टेंभुर्णीकर यांनी मुख्य अभियंत्यांशी चर्चा करून मागणीचे निवेदन दिले. या प्रश्नावर तातडीने उपाययोजना करून वैनगंगा नदीचे पाणी दूषित होणार नाही अशी मागणी केली. यावेळी अँड.टेंभुर्णीकर यांनी वैनगंगा नदीचे पाणी प्रदूषित होण्यास कारणीभूत असणार्‍यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली.