परिचारीका हया खऱ्या आरोग्यदूत – उषा मेंढे

0
15
गोंदिया,दि.१८ : ग्रामीण भागातील तळागाळातील जनतेला आरोग्याच्या सेवा देण्यासाठी परिचारीका हया रात्रंदिवस काम करतात. त्यांचे हे कार्य खऱ्या अर्थाने आरोग्यदूताचे कार्य आहे. असे प्रतिपादन जि.प.अध्यक्षा उषा मेंढे यांनी व्यक्त केले.  जिल्हा परिषद सभागृहात नुकतेच राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य सेवा कर्मचारी संघटना व नर्सेस संघटना यांच्या संयुक्त वतीने आयोजित जागतिक परिचारीका दिनाच्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरुन श्रीमती मेंढे बोलत होत्या. प्रमुख अतिथी म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सी.एल.पुलकुंडवार, शिक्षण व आरोग्य सेवेचे सभापती पी.जी.कटरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रवि धकाते, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राज गहलोत यांची उपस्थिती होती.
        श्रीमती मेंढे पुढे म्हणाल्या, प्लोरेन्स नाईटइंगल्स यांनी युध्दात दोन वर्ष जखमी सैनिकांची सेवा केली. तसेच जागतिक स्तरावर परिचारीका प्रशिक्षण केंद्र चालवून ग्रामीण व शहरी भागात आरोग्य सेवा देवदूताप्रमाणे दिली.
       डॉ.पुलकुंडवार म्हणाले, राज्यात गोंदिया जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रासारख्या चांगल्या संस्था मला कुठेही दिसल्या नाही. पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यास गोंदिया जिल्हा अग्रेसर आहे. आरोग्य विषयक कार्यक्रम राबवितांना आरोग्य परिचारीकांचे योगदान महत्वपूर्ण असून त्यांच्या कार्याला विसरता येणे शक्य नाही.
        श्री. कटरे म्हणाले, परिचारीकांची सेवा वाखानण्यासारखी आहे. त्यांच्या तत्पर आरोग्य सेवेमुळेच जिल्ह्यातील माता मृत्यू दर, अर्भक मृत्यू दर आणि कुपोषणाचे प्रमाण कमी झाले आहे.
        या कार्यक्रमात जिल्ह्यातील उत्कृष्ट काम करणाऱ्या आरोग्य सेविका, आरोग्य सहायीका व आरोग्य परिचारीका यांचा रोख रक्कम, प्रशस्तीपत्र व स्मृती चिन्ह देवून मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यामध्ये संध्या काळे, श्रीमती सी.पी.मानवटकर, धर्मशिला सोनटक्के, गायत्री मेंढे, वनिता इंगळे, अनु नांदणे, कुसूम लांजेवार, श्रीमती ए.एन.उईके, सुधा हरिणखेडे यांचा समावेश आहे.
        कार्यक्रमाला जिल्ह्यातील तालुका आरोग्य अधिकारी सर्वश्री डॉ.विनोद चव्हाण, डॉ.सी.डब्ल्यू.वंजारे, डॉ.विजय नाकाडे, डॉ.ब्राम्हणकर, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, जिल्हा आरोग्य विभागातील विस्तार अधिकारी, आरोग्य सहायक,  प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिचारीका व राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. प्रास्ताविक डॉ.राज गहलोत यांनी केले. संचालन डॉ.मिना वट्टी यांनी केले.