‘त्या’ नियमबाह्य कामाची चौकशी व्हावी

0
12

सडक अर्जुनी : जवळच असलेल्या कोदामेडी ग्रामपंचायतच्या अनियमित बांधकामाचे प्रकरण सतत चर्चेत असते. सभामंडप आणि दलित वस्ती सिमेंट रस्त्याचे काम अनियमितपणे करण्यात आले नसून त्या कामाचे बिल मिळावे याकरिता आवरासावर केल्या जात आहे. परंतु कामाची चौकशी करुनच बिल देण्यात यावे, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य निशांत राऊत यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे.
डिेसेंबर २0१५ मध्ये कोदामेडी येथे सभामंडपाचे काम व जानेवारी २0१६ ला सिमेंट रस्त्याचे काम पूर्ण झाले. २ फेब्रुवारी २0१६ ला ई-निविदा वृत्तपत्रामध्ये देण्यात आली. १७ फेब्रुवारीला ई-निविदा उघडण्यात आली.
२३ फेब्रुवारीला ई-निविदा मंजुरीसाठी सभा घेण्यात आली आणि सभेमध्ये सरपंच नोंदवहीवर नोंदवितात, दलित वस्तीतील सिमेंट रोडचे बिल काढण्यात यावे.
हा गोंधळ पाहून ग्रा.पं.चे सचिव आक्षेप घेतात. सदर कामाचा कार्यारंभ आदेश, कराराची प्रत आणि अंदाजपत्रकाची पत्र ग्रा.पं.मध्ये उपलब्ध नाही व सदर कामाची ई-निविदा देखील काढण्यात आली नाही.
कामातील अनियमितता लक्षात आल्यामुळे चुकीच्या पद्धतीने करण्यात आलेल्या बांधकामाची चौकशी करुनच बिल देण्यात यावे आणि नियमांचे उल्लंघन करुन करण्यात आलेल्या व्यवहाराची वसुली करण्यात यावी, अशी मागणी ग्रा.पं. सदस्य निशांत राऊत यांनी केली आहे.