चक्रीवादळ बाधितांना त्वरित भरपाई द्या-राष्ट्रवादी काँग्रेस

0
10

गोंदिया : शनिवारी आलेल्या चक्रीवादळाने जनजीवन विस्कळीत झाले. जिल्हाभरातील अनेक गावांत नागरिकांचे मोठेच नुकसान झाले. शेतपीक नष्ट झाले. शेकडो घरांच्या भिंती कोसळल्या. छत उडाले. भाजीपाला व फळ उत्पादक शेतकर्‍यांचे वृक्ष पडल्याने मोठे नुकसान झाले. पशूधनाची हानी झाली. विद्युत पोल पडले. यापूर्वी एप्रिलमध्ये अवकाळी पाऊस, चक्रीवादळ व वीज पडल्याने सामान्य नागरिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आ. राजेंद्र जैन यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकार्‍यांची भेट घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यासाठी निवेदन दिले.
निवेदनानुसार, संपूर्ण जिल्ह्यातील शेतकरी व नागरिकांचे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करून शेतकर्‍यांचे झालेले नुकसान बघता अधिकाधिक सहायत प्रदान करण्याची मागणी करण्यात आली.
जिल्ह्यात यावर्षी कमी पाऊस पडल्याने आधीच शेतकरी त्रस्त आहेत. यावर्षी विंधन विहिरींच्या भरवशावर शेतकर्‍यांनी मोठय़ा प्रमाणात उन्हाळी धान लावले. तसेच जिल्ह्यातील अनेक शेतकर्‍यांनी भाजीपाला व फळपिके लावली. परंतु एप्रिल महिन्यात अवकाळी पाऊस, चक्रीवादळ व दोन दिवसांपूर्वी २१ मे रोजी संपूर्ण जिल्ह्यात आलेल्या चक्रीवादळाने शेतकरी व नागरिकांचे मोठेच नुकसान झाले. शेतकरी व शेतमजुरांचे घरे पडली. जनावरांचे गोठे कोसळल्यामुळे जनावरांचा मृत्यू झाला. भिंती पडल्या व छत उडाल्यामुळे उघड्या आकाशाखाली अनेकांचे संसार आले.

अनेक शेतकर्‍यांनी बागायती व फळबाग शेती लावली आहेत. मात्र अनेक ठिकाणी झाडे पडल्यामुळे त्यांचे नुकसान झाले. दुष्काळी परिस्थिती असतानाही शासनाने जिल्ह्यात दुष्काळग्रस्त घोषित केले नाही. धानाच्या पिकासाठी ऑक्टोबर महिन्यात २00 मिमी पावसाची गरज होती, मात्र २ मिमी पाऊस पडल्याने जिल्ह्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती आहे.
हे सर्व नुकसान बघता येणार्‍या हंगामात शेतकर्‍यांना मोफत बी-बियाणे पुरविण्यात यावे. संकटात फसलेल्या शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी. शेतकर्‍यांना मोठय़ा प्रमाणात शासकीय व सहकारी बँकेच्या माध्यमातून कृषी कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे. बाधित घरांच्या नुकसानीचे सर्वेक्षण करून भरपाई देण्यात यावी. पशूंच्या मृत्यूचे अवलोकन करून भरपाई देण्यात यावी. अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. विद्युत पोल पडले आहेत. त्यांची दुरूस्ती त्वरित करण्यात यावी.
मागील दोन वर्षांपासून रोजगार हमी योजनेच्या कामाची मजुरी देण्यात आली नाही. अशा बिकट परिस्थितीत प्रलंबित मजुरी त्वरित देण्यात यावी, अशा मागण्यांचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसने दिले आहे. याप्रसंगी आ. राजेंद्र जैन, माजी आ. दिलीप बंसोड, नरेश माहेश्‍वरी, जिल्हाध्यक्ष विनोद हरिणखेडे, जि.प. पक्ष नेते गंगाधर परशुरामकर, प्रदेश प्रतिनिधी देवेंद्रनाथ चौबे, जिल्हा प्रवक्ता अशोक शहारे, शहर अध्यक्ष शिव शर्मा, तालुकाध्यक्ष कमलबापू बहेकार, जि.प. सदस्य सुखराम फुंडे, सुरेश हर्षे, राजेश भक्तवर्ती, बँक संचालक राजकुमार एन. जैन, रवि मुंदडा, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष केतन तुरकर, मुजीब पठान, टिकाराम मेंढे, करण गिल, संजिव राय, रौनक ठाकूर, संजू महाराज, बंशीधर अग्रवाल व इतर कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.