नवीन उद्योगांवरील बंदी हटविली

0
8

चंद्रपूर : जिल्ह्यातील एमआयडीसी ताडाळी, घुग्घुस व बल्लारपूर येथे वाढत्या प्रदूषणामुळे १३ जानेवारी २०१० ला नवीन उद्योग स्थापन करण्यावर बंदी घालण्यात आली होती. मात्र केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने ही बंदी नुकतीच हटविली असून उद्योग स्थापन करण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या या निर्णयाने ताडाळी, घुग्घुस, बल्लारपूर येथील एमआयडीसीमध्ये नवीन उद्योग स्थापन होऊन शेकडो बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध होणार आहे.बंदी हटविण्याच्या निर्णयामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर एमआयडीसी, ताडाळी, घुग्घुस व बल्लारपूर येथे अधिस्थगनामुळे बंद पडलेले उद्योग पूर्ववत सुरू होण्यास मदत झाली आहे. तसेच या क्षेत्रात गत पाच ते सहा वर्षापासून नवीन उद्योग विस्तार व गुंतवणूक थांबलेली होती, ती सुद्धा सुरू होणार असून या माध्यमातून नवीन रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणात होणार आहे.

देशात पर्यावरण मंत्रालयाद्वारे १३ जानेवारी २०१० पासून ४३ कॉम्प्रेहेन्सीव्ह इर्न्वामेंटल पोल्युशन इंडेक्स (सीपी) असलेल्या ठिकाणी अती प्रदूषणामुळे उद्योगावर बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड यांनी महाराष्ट्रात चंद्रपूर येथे फेब्रुवारी २०१६ मध्ये पाहणी करून सीपीची स्थिती जाणून घेतली व १८ एप्रिल २०१६ ला मंत्रालयाला अहवाल सादर केला. या अहवालात चंद्रपूर येथील सद्यस्थितीत सीपीचा गणक हा ५४.४२ असल्याचे म्हटले आहे. यापुर्वी म्हणजे २०१३ ला सीपीसीबी यांनी केलेल्या पाहणीत सीपीचा गणक हा ८१.९० होता. त्यामुळे सद्य:स्थितीतील ५४.४२ गणकाच्या आधारे उद्योगांवरील बंदी उठविण्यात आली आहे.

बंदी हटविण्यासाठी राज्यात नवे सरकार स्थापन झाल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर, चंद्रपूरचे आ. नाना श्यामकुळे व एमआयडीसी असोसिएशन तसेच बंद उद्योगातील प्रमुखांची संयुक्त बैठक झाली होती. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या विषयावर सकारात्मक भूमिका घेतली होती.