केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकाने साधला शेतकऱ्यांशी संवाद

0
10

वाशिम : सन 2015 मधील खरीप हंगामात अत्यल्प पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची माहिती घेण्याकरिता आलेल्या केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकाने आज कारंजा व मंगरूळपीर तालुक्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांकडून खरीप हंगामात पेरणीसह रासायनिक खते, किटकनाशके आदीवर झालेल्या खर्चाची व मिळालेल्या एकूण उत्पन्नाची माहिती घेतली. 

केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकामध्ये नीती आयोगाचे वरिष्ठ कृषी शास्त्रज्ञ डॉ. रामानंद, केंद्र शासनाच्या ग्राम विकास विभागाचे अवर सचिव रामा वर्मा, केंद्रीय विद्युत प्राधिकरणचे संचालक जे.के.राठोड, केंद्रीय जलसंसाधन विभागाचे उपसंचालक मिलिंद पानपाटील, भारतीय खाद्य निगमचे सहाय्यक प्रबंधक एम. एम. बोऱ्हाडे, राज्य शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाचे उपसचिव उपसचिव अशोक आत्राम यांचा समावेश होता. अमरावती विभागाचे महसूल उपयुक्त रवींद्र ठाकरे, कृषी सहसंचालक शुध्दोधन सरदार या पथकासोबत होते. या पथकाने सर्वप्रथम कारंजा तालुक्यातील खेर्डा, शेवती गावासह मंगरूळपीर तालुक्यातील चांभई-बालदेव गावातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. 

खेर्डा येथे झालेल्या चर्चेत जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती ज्योतीताई गणेशपुरे यांनीही पथकाला नुकसानीची माहिती दिली. त्यानंतर मंगरूळपीर पंचायत समिती सभागृहात उपस्थित शेतकऱ्यांकडूनही केंद्रीय पथकाने खरीप हंगामाविषयी माहिती घेतली.

याप्रसंगी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, मंगरूळपीरचे उपविभागीय अधिकारी राजेश पारनाईक, कारंजाचे उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे, वाशिम पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता अजय कोहीरकर, तहसीलदार सचिन पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, जिल्हा कृषी विकास अधिकारी आबासाहेब धापते, जिल्हा उपनिबंधक ज्ञानेश्वर खाडे, लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता जयंत शिंदे आदी उपस्थित होते.