नागपूर मेट्रोसाठी ‘कन्सलटंट’ची नियुक्त

0
13

नागपूर,दि.11 – उपराजधानीतील महत्त्वाच्या मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी ‘जनरल कन्सलटंट’ची नियुक्त करण्यात आली आहे. यासाठी तीन देशातील चार कंपन्यांच्या समूहाला २२१ कोटींचे काम देण्यात आले आहे. यात फ्रान्सची सिस्ट्रा कंपनी व एइजिस कंपनी, अमेरिकेची एइकॉम व भारतीय रेल्वेची उपक्रम कंपनी राइट्सचा समावेश आहे.
नागपूर मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक बृजेश दीक्षित यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. दीक्षित म्हणाले की, संबंधित चार कंपन्यांच्या समूहाने सादर केलेली निविदा ऑफर सर्वात कमी होती. याशिवाय संबंधित समूह तांत्रिकदृष्ट्या अधिक सक्षम व अनुभवी होता. मेट्रो रेल्वे प्रकल्प साकारण्याचा या समूहाला चांगला अनुभव आहे. त्यामुळेच त्यांची या प्रकल्पासाठी निवड करण्यात आली. या समूहाला चार वर्षांसाठी २२१ कोटी रुपयांचे काम देण्यात आले आहे.
हा समूह जनरल कन्सलटंट म्हणून मेट्रो रेल्वे प्रकल्पाला गती देण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करेल. यात सिव्हिल कामे, सिग्नल, ट्रॅक, सेफ्टी, क्वालिटी, टेस्टिंग, कमिशनिंग आदींशी संबंधित कामांचा समावेश आहे.