जेएसव्ही डेव्हलपर्सने लाखोंनी गंडविले

0
9

भंडारा : शहरात जे.एस.व्ही. डेव्हलपर्स इंडिया लि. या नावाची कंपनी उघडली होती. त्या कंपनीत सहा वर्षात दामदुप्पट करून देतो म्हणून खातेदारांना प्रलोभन दिले आणि एफ.डी. व आर.डी. च्या नावाने करोडो रुपयांनी फसवणूक करून गैरअर्जदार बेपत्ता झाले आहेत.
भंडारा शहरात सुरु असलेले ऑफिस सुद्धा बंद केले आहेत. त्यामुळे ग्राहकांची फसवणूक झाल्याचे स्पष्ट लक्षात आले.
त्यामुळे काही अर्जदारांनी से.बी. या केंद्रीय संस्थेकडे मुंबई येथे न्याय मागितला. त्यात १८ फेब्रुवारी २0१६ रोजी से.बी. ने गुंतवणूकदारांच्या बाजूने स्पष्ट निकाल दिला.
या निकालामध्ये जे.एस.व्ही. डेव्हलपर्सच्या नावाने असलेली संपत्ती जप्त करून गुंतवणुकदारांचे रक्कम मिळवून देण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले. तसेच पोलिसांना गुन्हा दाखल करून घेण्याचे आदेश देण्यात आले.
या निकालाच्या आधारे जिल्हाधिकारी भंडारा आणि पोलीस अधीक्षक भंडारा यांना तिनदा विनंती अर्ज करून सुद्धा अजूनपर्यंत कुठलीच कारवाई केलेली नाही व आम्हा गुंतवणूकदारांची रक्कम मिळालेली नाही.
जे.एस.व्ही. डेव्हलपर्स इंडिया लि. या कंपनीचे सर्व शाखा व कार्यालय बंद करून वरील सर्व गैरअर्जदारांनी ‘जय विनायक बिल्डक्रॉप्ट’ या नावाने नवीन संस्था उघडून लोकांना पुन्हा फसविण्याचा गोरखधंदा सुरु केला असल्याची माहिती आहे. याच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालय समोर उपोषण सुरु करण्यात आले आहे.