समाधान शिबीर हे जीवनमान उंचावण्यास उपयुक्त- पालकमंत्री बडोले

0
20

विस्तारीत समाधान शिबिराचे उदघाटन
गोंदिया,दि.१६ : शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ गावपातळीवरील लाभार्थ्यांना मिळणे गरजेचे आहे. विस्तारीत स्वरुपातील समाधान शिबीर हे ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांचे व शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास उपयुक्त आहे. असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
आज सडक/अर्जुनी येथील नविन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या सभागृहात महाराजस्व अभियानांतर्गत विस्तारीत स्वरुपातील समाधान शिबिराचे उदघाटन केल्यानंतर उपस्थितांना मार्गदर्शन करतांना श्री.बडोले बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष श्रीमती रचना गहाणे, पंचायत समिती सभापती कविता रंगारी, उपसभापती विलास शिवणकर, जिल्हा परिषद सदस्य श्रीमती माधुरी पाथोडे, श्रीमती शिला चव्हाण, रमेश चुऱ्हे, पंचायत समिती सदस्य राजेश कठाणे, गिरीधारी हत्तीमारे, श्रीमती गायत्री येरले, श्रीमती इंदू कापगते यांची प्रमुख उपस्थिती होती.
शेतकरी यावर्षीही नापिकीमुळे हवालदिल झाला आहे असे सांगून श्री.बडोले पुढे म्हणाले, शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी बँकांनी मदत करावी. केंद्र सरकारला २ वर्ष पूर्ण झाले आहे. अटल पेंशन योजना, जनधन योजना यासह अन्य योजनांचा लाभ नागरिकांनी मोठ्या प्रमाणात घ्यावा. या शिबिरात लावण्यात आलेल्या विविध स्टॉल्सला उपस्थित असलेल्या बंधु-भगिनींनी भेट देऊन योजनांची माहिती जाणून घ्यावी. अधिकारी व कर्मचाऱ्यांचे विविध विभागात बरेच पदे रिक्त आहेत. त्यामुळे नागरिकांनी पुढाकार घेऊन विविध योजनांची माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यास प्रशासनास सहकार्य करावे. असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले.
अध्यक्षस्थानावरुन बोलतांना जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी म्हणाले, विस्तारीत स्वरुपातील समाधान शिबिराच्या यशस्वीतेत लोकांचा सहभाग महत्वाचा आहे. विविध यंत्रणांनी आपल्या स्टॉल्सद्वारे त्यांच्या विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध यंत्रणांची माहिती दयावी. शासनाच्या विविध लोकोपयोगी योजनांची माहिती या शिबिरातून नागरिकाना मिळण्यास मदत होईल. बचतगटातील महिलांनी आरोग्य, शिक्षण व अन्य योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवावी असेही त्यांनी सांगितले.
डॉ.पुलकुंडवार म्हणाले, विविध योजनांचा लाभ शेवटच्या लाभार्थ्याला मिळाला पाहिजे. यासाठी हे शिबीर उपयुक्त आहे. शिक्षण, आरोग्य व रोजगार यामधून मानव विकास निर्देशांक वाढण्यास मदत होते. समाधान शिबिरामुळे विविध योजनांची माहिती विविध घटकांना मिळण्यास मदत होणार आहे,असे त्यांनी सांगितले.
उपाध्यक्ष श्रीमती गहाणे म्हणाल्या, विकासाच्या कामात सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे. जलयुक्त शिवार अभियान, कुटुंब अर्थसहाय्‍य योजना यासह अन्य योजनांचा लाभ लाभार्थ्यांना मिळत आहे. विविध योजनांची माहिती जाणून घेऊन त्या योजनांचा लाभ घेण्यास हे शिबीर उपयुक्त असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी पालकमंत्री बडोले यांच्या हस्ते राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेच्या लाभार्थी भूमिका भिमटे, अवंता शेंडे, तुळजा मौजे, नैना शेलारे, राधिका बनकर, छाया कोरे यांच्यासह १५ लाभार्थ्यांना प्रत्येकी २० हजार रुपयांचे धनादेश, वन विभागाच्या वतीने प्रधानटोला येथील देवानंद सलामे व शामराव धुर्वे यांना गॅस शेगडीचे वाटप, कृषि विभागाच्या वतीने आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या देवचंद तांडेकर या वारसाला शेती कसण्यासाठी मोफत बी-बियाणे वाटप, महाराष्ट्र जमीन महसूल विभागवारचे वाटणीपत्र आदेश केसलवाडा येथील दयानंद भिवगडे यांना तर विशेष कार्यकारी अधिकारी या पदाचे शिक्के जिल्हा परिषद सदस्य शिला चव्हाण, माधुरी पाथोडे, रमेश चुऱ्हे, पंचायत समिती सभापती कविता रंगारी व उपसभापती विलास शिवणकर यांना पालकमंत्री बडोले यांच्या हस्ते देण्यात आले.
या शिबिराला सडक/अर्जुनी तालुक्यातील अनेक गावातील बचत गटातील महिला, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, नागरिक तसेच विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसिलदार व्ही.एम.परळीकर यांनी केले. संचालन श्री. मेश्राम यांनी केले. उपस्थितांचे आभार गटविकास अधिकारी लोहकरे यांनी मानले.