नगरपरिषदा, नगरपंचायतींच्या फेर प्रभागरचना,२ जुलै रोजी आरक्षण !

0
17

गोंदिया,दि.17- डिसेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत मुदत संपणा-या नगरपरिषदा आणि नगरपंचायतींची प्रभागरचना, आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम सरकारने जाहीर केला असून; १० ऑगस्टला अंतिम प्रभाग रचनेला मान्यता मिळून प्रसिद्ध केल्या जाणार आहेत.तर 2 जुलैपर्यंत सदस्य पदाचे आरक्षण जाहिर करण्यात येणार असल्याची माहिती निवडणुक विभागाच्या सुत्रानी दिली.

या नगरपरिषदांच्या सदस्य पदांच्या आरक्षणाची सोडत २ जुलै २०१६ रोजी काढणे, ५ जुलै रोजी प्रारूप प्रभाग रचना, प्रभागदर्शक नकाशेव सदस्य पदांच्या आरक्षणाची अधिसूचना कलम १० नुसार रहिवाशांच्या माहितीसाठी तसेच हरकती व सुचना मागवण्यासाठी वृत्तपत्रात तसेच स्थानिक पातळीवर प्रसिद्धी करणे, ५ जुलै ते १४ जुलैपर्यंत हरकती व सूचना मागवण्याचा कालावधी, २७ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात प्राप्त हरकती व सूचनांवर सुनावणी होणार असून; या हरकतींवर २ ऑगस्ट रोजी संबंधित विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक नगरपरिषद प्रशासनाकडे अहवाल पाठवण्याची मुदत आहे. १६ ऑगस्ट रोजी अंतिम सूचना जाहीर करण्यात येणार आहे.

यात नगरपरिषद, नगरपंचायतींच्या प्रभागांची संख्या, त्यांची प्रभागनिहाय एकूण व अनुसूचित जाती तसेच अनुसूचित जमातींची २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या, क्षेत्र, सीमांकन, नकाशा, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती आरक्षण याचा समावेश असलेले प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव संबंधित मुख्याधिका-यांनी २४ जूनपर्यंत जिल्हाधिका-यांकडे सादर करायचा आहे.

त्यानंतर २९ जूनपर्यंत या प्रस्तावांना जिल्हाधिका-यांनी मान्यता देणे अपेक्षित आहे. ३० जून रोजी सदस्य पदांच्या आरक्षणाच्या सोडतीकरता जिल्हाधिकारी, नगपरिषदा आणि नगरपंचायतीच्या वेबसाईटवर नोटिस प्रसिद्ध केली जाणार आहे.

त्यानंतर २ जुलैपर्यंत नगरपरिषदा, नगर पंचायतींच्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमातींतील महिला, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व त्यातील महिला तसेच सर्वसाधारण महिला सदस्य पदांच्या आरक्षणाची सोडत काढली जाणार आहे.

५ जुलैला प्रारूप प्रभाग रचना, प्रभागदर्शक नकाशे व सदस्यपदांच्या आरक्षणाची रहिवाशांच्या माहितीसाठी व हरकती व सूचना मागवण्यासाठी वृत्तपत्रात व स्थानिक पातळीवर, जिल्हाधिकारी कार्यालय, नगरपरिषद, नगरपंचायतीच्या वेबसाईटवर प्रसिद्ध केली जाणार आहे. ५ जुलै ते १४ जुलै या कालावधीत हरकती व सूचना मागवण्यात आल्या आहेत.

२७ जुलैपर्यंत प्राप्त हरकती व सूचनांवर जिल्हाधिका-यांच्या समक्ष सुनावणी होणार आहे. त्यानंतर २ ऑगस्टपर्यंत हरकती व सूचनांच्या अनुषंगाने अभिप्राय देऊन हे प्रस्ताव आयुक्तांकडे अभिप्रायासाठी पाठवले जाणार आहेत. तर १० ऑगस्ट रोजी संबंधित विभागीय आयुक्त अंतिम प्रभाग रचनेला मान्यता देणार आहेत. ही प्रभागरचना संबंधितांच्या वेबसाईटवरही प्रसिद्ध होणार आहे.