आ.सोलेंच्या वृक्षदिंडीचा रामटेक मधून शुभारंभ

0
9

नागपूर,दि.20- राज्यात १ जुलै रोजी होणा-या दोन कोटी वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमांसंदर्भात जनजागृतीच्या दृष्टिने नागपूर विभागाचे पदवीधर मतदारसंघाचे आमदार अनिल सोले यांनी ग्रीन अर्थ ऑर्गनायझेशन या संस्थेच्या माध्यमातून वृक्षदिंडीसाठी पुढाकार घेतला आहे.पावन झालेल्या रामटेकच्या भुमीतुन वृक्षदिंडीचा शुभारंभ होतोय हे विशेष महत्वाचे आहे. दोन कोटी वृक्ष लागवडीच्या संकल्पाकडे सकारात्मक दृष्टीने बघा, या संदर्भात सकारात्मक भूमिका ठेवा असे आवाहन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
रामटेक येथे आमदार अनिल सोले यांच्या ग्रीन अर्थ ऑर्गनायझेशन या संस्थेद्वारे आयोजित वृक्षदिंडीच्या शुभारंभाप्रसंगी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार बोलत होते. पर्यावरणाचा होणारा –हास थांबविण्यासाठी व त्यामुळेद्भवणा-या समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी वृक्ष लागवड हाच प्रभावी उपाय आहे असे प्रतिपादन मुनगंटीवार यांनी केले. दोन कोटी वृक्ष लागवडीचा मुनगंटीवार यांचा संकल्प वसुंधरेप्रती आपले कर्तव्य पुर्ण करण्याच्या समाजाभिमुख उपक्रम आहे. हा उपक्रम यशस्वी व्हावा म्हणून प्रत्येक नागरिकाने सजगतेने आपले योगदान द्यावे असे आवाहन आमदार अनिल सोले यांनी केले. अशा पद्धतीने हरित महाराष्ट्राचा संकल्प करणारे मुनगंटीवार हे पहिलेच वनमंत्री असल्याचे अनिल सोले म्हणाले. या वृक्षदिंडीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ही वृक्षदिंडी विविध जिल्ह्यांमध्ये मार्गक्रमण करत जनजागृती करणार आहे.