पक्षकारांनी मध्यस्थी प्रक्रियेचा लाभ घ्यावा – न्या.मु.ग.गिरटकर

0
12

गोंदिया, दि.२० : मध्यस्थी प्रक्रियेमुळे तणावातून मुक्तता, मानसिक शांती तसेच पक्षकारांचा पैसा व वेळ वाचतो. नातेसंबंध पुन:प्रस्थापित होण्यास व टिकून ठेवण्यास पुनश्च: संधी मिळते. वर्षानुवर्षे न्यायालयात प्रकरणे चालविण्यापेक्षा पक्षकारांनी मध्यस्थी प्रक्रियेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मु.ग.गिरटकर यांनी केले.
१८ जून रोजी जिल्हा मध्यस्थी केंद्राच्या वतीने जिल्हा न्यायालयात आयोजित मध्यस्थी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यक्षस्थानावरुन न्या.गिरटकर बोलत होते. यावेळी न्या.ए.एच.लध्दड, न्या.श्रीमती इशरत शेख यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड.टी.बी.कटरे, ॲड.ओ.जी.मेठी, ॲड.बिना बाजपेयी यांचीही प्रामुख्याने उपस्थिती होती.
न्या.गिरटकर पुढे म्हणाले, वकीलांनी जास्तीत जास्त पक्षकारांना मध्यस्थी योजनेची माहिती देवून या योजनेचा लाभ त्यांना मिळवून दिला पाहिजे. त्यामुळे पक्षकारांना झटपट न्याय मिळण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मध्यस्थी योजना व त्याचे फायदे या विषयावर मार्गदर्शन करतांना न्या.लध्दड म्हणाले, न्यायालयात दाखल असलेली प्रकरणे मध्यस्थीमध्ये ठेवण्यात आल्यानंतर मध्यस्थ हा दोन्ही वादातील पक्षकारांचे म्हणणे ऐकून सदर प्रकरण सामंजस्यपणाने मिटविण्याचा प्रयत्न करतो. परस्परांची अनूकूल परिस्थिती निर्माण करण्याचे काम करतो. तसेच मध्यस्थी दरम्यान घेतलेले पुरावे हे ग्राहय धरल्या जात नाही तर फक्त दोन्ही वादीमध्ये मध्यस्थी झालेला तडजोडनामाच प्रकरणाचे न्याय निर्णय देण्याकरीता ग्राहय धरल्या जातो. त्यामुळे मुळ प्रकरणाला कोणतीही हानी न होता पक्षकारांना फक्त फायदाच होतो असे त्यांनी सांगितले.
मध्यस्थी प्रक्रियेअंतर्गत कोणत्या प्रकारची प्रकरणे मध्यस्थीसाठी ठेवली जातात व मध्यस्थी प्रक्रिया कशी पूर्ण होते या विषयावर मार्गदर्शन करतांना न्या.श्रीमती शेख म्हणाल्या, सर्व दिवाणी स्वरुपाची खटले, कौंटुबिक वादाची प्रकरणे, खावटी प्रकरणे, संपत्ती विवादातील प्रकरणे व इतर तडजोडपात्र सर्वप्रकारची फौजदारी प्रकरणे मध्यस्थीकरीता ठेवण्यात येतात. पक्षकारांनी लेखी अर्ज संबंधित न्यायालयात सादर केल्यास सदर प्रकरण संबंधित न्यायालय मध्यस्थीकरीता पाठविण्यात येते. न्यायालयातील प्रकरणे मध्यस्थीकरीता पाठवून लवकरात लवकर निकाली काढता येतात असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी ॲड.ओ.जी.मेठी व ॲड.बिना बाजपेयी यांनीही मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून मध्यस्थ वकीलांना त्यांचेकडे असलेली प्रकरणे मध्यस्थी प्रक्रियेद्वारे कशाप्रकारे लवकरात लवकर निकाली निघाली याबाबत अनुभव कथन केले व इतर वकीलांनी त्यांच्याकडे असलेली जास्तीत जास्त योग्य प्रकरणे मध्यस्थीकरीता पाठवावी व आपल्या पक्षकारांना त्वरित न्याय मिळवून दयावा असे आवाहनही केले. संचालन ॲड.शबाना अंसारी यांनी केले. उपस्थितांचे आभार ॲड.टी.बी.कटरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अधीक्षक रा.ग.बोरीकर, महेंद्र पटले, कपील पिल्लेवान व जिल्हा न्यायालय गोंदिया येथील कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.