संविधानाच्या आठव्या सूचीत ‘पाली’चा समावेश करा

0
29

चंद्रपूर,दि.24-भारताच्या संविधानात आठव्या अनुसूचीअंतर्गत एकूण २२ भाषांमध्ये महाराष्ट्रातील कोकणी, सिंधी आणि नेपाळी भाषेचा समावेश आहे. परंतु भारतातील बौद्धधर्मीय १५ कोटी लोकांच्या ‘पाली’ भाषेचा समावेश नसल्यामुळे अखिल भारतीय भिखू संघाचे सभासद भदन्त धम्मप्रकाश संबोधी यांनी संविधानाचा अनुच्छेद ३४४(१), ३५१(१) अन्वये अनुसूची आठमध्ये समाविष्ट करण्याची मागणी जिल्हाधिकार्‍यामार्फत राष्ट्रपती, पंतप्रधान, लोकसभा अध्यक्ष, राजभाषा विभागाचे अध्यक्ष यांना केली आहे.यावेळी भिखुसंघ बुद्धगयाचे आजीवन सभासद धम्मप्रकाश संबोधि, अरहंत भूमी, भदन्त र्शद्धारक्षित, समपा सुमेध, सुमंगल आबोरा वर्धा, चैत्तिय बोधी नागपूर यांची उपस्थिती होती.
भारतातील एकूण ५६ विश्‍वविद्यालयाच्या तिनशेपेक्षा जास्त महाविद्यालयांमध्ये पदवी आणि पदव्युत्तर बुद्धवचन पाली भाषेचा अभ्यास व संशोधन करणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या दरवर्षी लाखोंच्या आसपास असते. भारत सरकारद्वारा संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत सन २0१३ पर्यंत बुद्धवचन ‘पाली’ भाषेचा समावेश होता. परंतु संघ लोकसेवा आयोग परीक्षेंतर्गत वैकल्पिक विषय पाली भाषा वगळण्यात आली आहे. परिणामत: पाली भाषेच्या विद्यार्थ्यांना वंचित करण्यात आले आहे. भारत सरकारने धार्मिक अल्पसंख्याक लोकांच्या पाली भाषेविषयी भेदभाव निर्माण केला आहे.
भारताचे संविधान भाग १७ राजभाषा संबंधित आहे. अनुच्छेद ३४३(१) अन्वये संघराज्याची राजभाषा हिंदी आणि लिपी देवनगरी आहे. अनुच्छेद ३४४(१) राजभाषा संबंधी आयोग आणि संसद द्वारा नियुक्त समिती अनुच्छेद ३५१(१) हिंदी भाषा विकास संबंधी संवैधानिक निर्देश आहे. ३४४(१), ३५१ नुसार संविधान आठवी अनुसूचि अंतर्गत २२ भाषा समाविष्ट केल्या गेल्या. परंतु भारताच्या प्राचीन पाली भाषेचा समावेश अनुसूची आठमध्ये नाही. ही अतितीव्र खेदाची बाब आहे. विश्‍वातील एकूण ११0 देशामध्ये पाली भाषेचा आणि त्यांच्या देशातील लिपीचा वापर होतो. ही पाली भाषा भारतातील बुद्धकालिन असूनही जागतिक लोक त्यांचा अर्वाचीन वापर करून जतन करण्यासाठी कठोर प्रयत्न करतात. भारतातील राज्यकर्ते त्याविषयी भारतात उदासीन आहेत. परंतु भारताच्या बाहेर गेल्यावर बुद्ध व बौद्ध संस्कृतीविषयी बोलून राज्यलाभ प्राप्त करून घेतात. अशा तर्‍हेने बुद्धवचन पाली भाषेचा भेदभाव निर्माण करण्यात आलेला आहे.
भारताच्या राष्ट्रपती भवनातील राष्ट्रपतींच्या सिंहासनाच्या वर बुद्ध वचन पाली भाषेत ‘धम्मचक्र प्रवर्तन, भारताची राजमुद्रा, राष्ट्रध्वजावर अशोकचक्र, संसदेतील पहिला पुतळा सम्राट अशोकांचे आजोबा चंद्रगुप्त मौर्य यांचाच आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या मनातील विचार ज्या प्रसार माध्यमाद्वारा पसारित करतात त्या आकाशवाणीचे घोषवाक्य ‘बहुजन हिताय-बहुजन सुखय’ पाली भाषेमध्ये आहे. तरीसुध्दा पाली भाषेविषयी भेदभाव निर्माण करण्यात येत आहे.
भारत देशाचा इतिहास इ.स. पूर्व ६ वे शतक बुध्द जन्मतिथीपासून सुरु होतो. प्राचिन स्तुप, चैतन्य, उद्यान, वन, पुण्यकरणी, जनपद, निगम, शिल्पलेख, स्तंभलेख, अभिलेख, शिल्प, नाणी यातील पाली भाषा आणि ‘ब्रम्हो खरोष्टी’ लिपीमध्ये बौद्धधर्मीय पाली भाषेत प्राचिन साहित्य जतन करून ठेवण्यात आले आहे. पाली भाषा भारताची ओळख आहे.म्हणून संविधानाच्या अनुच्छेद ३४४(१) अन्वये अनुसूचि आठमध्ये पाली भाषा समाविष्ट करण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले.