पशुसंवर्धनच्या ५० टक्के अनुदानावर योजना

0
19

१२ जुलैपर्यंत अर्ज मागविले
गोंदिया,दि.२४ : शेतीपुरक जोडधंदा म्हणून पशुपालन व कुक्कूटपालन व्यवसाय करुन आर्थिक प्रगती व्हावी यासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत ५० टक्के अनुदानावर विविध योजना राबविण्यात येत आहे. राज्यस्तरीय योजनेअंतर्गत नाविन्यपूर्ण योजना सन २०१६-१७ या वर्षात राबविण्यात येणार असून सहा, चार किंवा दोन दुधाळ गाई किंवा म्हशीचे गट वाटप करण्यात येणार आहे. ही योजना सर्व प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी राबविण्यात येणार आहे. ठाणबंध पध्दतीने शेळीपालन करणे व एक हजार मांसल पक्षी संगोपनासाठी पक्षीगृह बांधण्यासाठी राज्यस्तरीय योजना ५० टक्के अनुदानावर राबविण्यात येणार आहे.
या योजनेचे अर्ज संबंधित पशुवैद्यकीय दवाखान्यात सादर करावे. अर्ज १२ जुलैपर्यंत स्विकारण्यात येतील. ज्या लाभार्थ्यांनी किंवा लाभार्थी कुटुंबातील व्यक्तींनी मागील तीन वर्षामध्ये वरील योजनेचा लाभ घेतला असेल किंवा जिल्हा योजनेंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनेचा लाभ घेतला आहे अशा लाभार्थ्यांनी नव्याने अर्ज सादर करु नये. अधिक माहितीसाठी पशुधन विकास अधिकारी पंचायत समिती येथे संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त गोंदिया यांनी केले आहे.